22 वर्षांची सेवा, पुणे मनपात दरारा असणारे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त, असा राहिला प्रवास
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुणे महापालिकेतील शहर अभियंता पदावरून प्रशांत वाघमारे हे काल सेवानिवृत्त झाले. गेल्या 22 वर्षांपासून त्यांनी शहर अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली.
पुणे : पुणे महापालिकेतील शहर अभियंता पदावरून प्रशांत वाघमारे हे काल सेवानिवृत्त झाले. गेल्या 22 वर्षांपासून त्यांनी शहर अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभाला महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, स्थानिक प्रशासन तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. या समारंभातील गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रशांत वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर अनिरुद्ध पावसकर हे पुणे महापालिकेचे पुढील शहर अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत.
पुणे महानगरपालिकेत प्रशांत वाघमारे हे गेल्या 22 वर्षांपासून शहर अभियंता पदावर कार्यरत होते. प्रशासनावर मजबूत पकड असलेले अभियंता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची विकासकामे झाली. नदी काठ सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प, शहराचा विकास आराखडा, बांधकाम नियमावली यांसारखे निर्णय त्यांच्या काळात घेण्यात आले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
शहर अभियंता म्हणून अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे जबाबदारी
पुणे महानगरपालिकेचे पुढील शहर अभियंता म्हणून अनिरुद्ध पावसकर हे कार्यभार स्वीकारणार आहेत. याबाबतची प्रक्रिया डिसेंबर महिन्यातच पार पडली होती. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत अनिरुद्ध पावसकर यांच्या नावाला शहर अभियंता पदासाठी मान्यता देण्यात आली. त्यानुसार 20 जानेवारी रोजी त्यांना मुख्य अभियंता पदावरून शहर अभियंता पदावर पदोन्नतीचे अधिकृत पत्र देण्यात आले होते. प्रशांत वाघमारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर पावसकर यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांमुळे ते सोमवारी शहर अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 6:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
22 वर्षांची सेवा, पुणे मनपात दरारा असणारे शहर अभियंता प्रशांत वाघमारे सेवानिवृत्त, असा राहिला प्रवास








