'8 कोटी द्या, मगच काम करतो'; पुण्यात 'एसीबी'ची फिल्मी स्टाईल कारवाई, लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) प्रशासक भास्कर राजाराम पोळ (वय ५६, रा. नऱ्हे) याला पकडलं.
पुणे : पुण्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरात एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील नवीन सभासदांना समभाग प्रमाणपत्र (Share Certificates) देण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे . या लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) प्रशासक भास्कर राजाराम पोळ (वय ५६, रा. नऱ्हे) याला पकडलं. शनिवार पेठेतील एका कार्यालयाजवळ सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणी प्रशासक भास्कर पोळ याच्यासह सोसायटीचा अवसायक (Liquidator) विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. धायरी फाटा) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडीतील एकता सहकारी सोसायटीत ३२ नवीन सभासदांनी जुन्या सभासदांकडून समभाग खरेदी केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक झाली होती. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांनी आणि अन्य नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालीन प्रशासक पोळ याच्याकडे समभाग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. पोळ याने तक्रारदार सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला होता, तर इतरांचे अर्ज निकाली काढले होते.
advertisement
सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांनी पुन्हा पोळ याची भेट घेऊन प्रमाणपत्राबद्दल विचारणा केली. तेव्हा पोळ याने तक्रारदारासह अन्य ३२ सभासदांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःसाठी आणि अवसायक विनोद देशमुख यांच्यासाठी तीन कोटी रुपयांची लाच मागितली. एवढेच नव्हे तर, भविष्यात सोसायटीच्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत तक्रारदार सांगतील, त्या व्यक्तीस जागा मिळवून देऊ असे सांगून त्याने अतिरिक्त पाच कोटी रुपयांची मागणी केली होती.
advertisement
पोळने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये मागितल्याची तक्रार व्यावसायिकाने एसीबीकडे केली. तांत्रिक पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोळ तक्रारदाराच्या शनिवार पेठेतील कार्यालयाजवळ लाच घेण्यासाठी आला. एसीबीच्या पथकाने सापळा रचून पोळ याला रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'8 कोटी द्या, मगच काम करतो'; पुण्यात 'एसीबी'ची फिल्मी स्टाईल कारवाई, लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडलं


