Pune Crime: दिराने वहिनीची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडला; प्रकरणात पुणे न्यायालयाचा मोठा निकाल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रागाच्या भरात धुळा याने सुमनबाईंच्या डोक्यात दगड आणि पाईपने प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करून तो थांबला नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सुमनबाईंचा मृतदेह खड्डा खणून जमिनीत गाडून टाकला
पुणे: पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर वहिनीची हत्या करणाऱ्या चुलत दिरास पुणे जिल्हा न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी आरोपीला जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तब्बल आठ वर्षांनंतर या क्रूर हत्याकांडाचा निकाल लागला असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
नेमकी घटना काय?
शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव धुळा बाबा गोरड (४२, रा. साकुर्डे, पुरंदर) असे आहे. १३ सप्टेंबर २०१७ रोजी ही हृदयद्रावक घटना घडली होती. मृत महिला सुमनबाई (४५) या आरोपीची चुलत वहिनी होती. सुमनबाईंचे पती १९९९ मध्येच वारले होते. त्यांचा मुलगा आनंद गोरड हा श्रीगोंदा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. घटनेच्या दोन दिवस आधी सुमनबाई मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याला २ हजार रुपये देऊन त्या गावाकडे परत निघाल्या, मात्र त्या घरी पोहोचल्याच नाहीत.
advertisement
सुमनबाई या आरोपी धुळा गोरड याच्याकडे आपले उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात धुळा याने सुमनबाईंच्या डोक्यात दगड आणि पाईपने प्रहार करून त्यांची निर्घृण हत्या केली. केवळ हत्या करून तो थांबला नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सुमनबाईंचा मृतदेह खड्डा खणून जमिनीत गाडून टाकला. या प्रकरणी मृत सुमनबाईंचा मुलगा आनंद याने जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी मांडलेला पुरावा आणि साक्षीदारांच्या जबानीवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच १५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष तुरुंगवास) ठोठावला आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडित मुलाला ३ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. वाकोडे आणि आर. व्ही. माळेगाव यांनी केला होता.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: दिराने वहिनीची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडला; प्रकरणात पुणे न्यायालयाचा मोठा निकाल








