आनंदावर विरजन! पुण्यात लग्न सुरू असतानाच 'ते' कार्यालयात शिरले; केलं असं काही की वधू हादरली
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बाणेर परिसरातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाच्या गडबडीत चोरट्यांनी सहा लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची मोठी घटना समोर आली आहे
पुणे : पुण्यातून चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील बाणेर परिसरातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाच्या गडबडीत चोरट्यांनी सहा लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची मोठी घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ सुरू असताना, त्यांनी सोन्याचे दागिने, १ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल असलेली एक पिशवी टेबलवर ठेवली होती.
चोरट्यांनी पाळत ठेवून वधू पक्षाचे लक्ष नसल्याची संधी साधली आणि पिशवी घेऊन पोबारा केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
धायरीत डेअरीचे कुलूप तोडून ९२ हजार रुपयांची रोकड चोरी
दुसऱ्या एका घटनेत धायरी भागात चोरट्यांनी एका डेअरीचे कुलूप तोडून गल्ल्यातील ९२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात तक्रारदाराची डेअरी आहे. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी डेअरीचे कुलूप तोडले आणि गल्ल्यातील रोकड घेऊन पसार झाले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी मोरे या चोरीचा तपास करत आहेत.
advertisement
पीएमपी प्रवासात ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची बांगडी लंपास
प्रवासादरम्यान चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. विश्रांतवाडी परिसरात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्यांनी हातचलाखीने लांबवली. धानोरी भागात राहणाऱ्या या महिलेने याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्वारगेटमध्ये पादचारी तरुणाला धमकावून मोबाईल हिसकावला
शहरातील स्वारगेट भागात पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. २८) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार तरुण शंकरशेठ रस्त्यावरून पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याला धमकावले आणि जबरदस्तीने त्याचा मोबाईल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आनंदावर विरजन! पुण्यात लग्न सुरू असतानाच 'ते' कार्यालयात शिरले; केलं असं काही की वधू हादरली









