Pune: 15 डिसेंबर डेडलाइन! रस्त्यांच्या कामात उशीर झाला तर ठेकेदारांना रोज 1 लाखाचा दंड
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: पुढील वर्षी होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज स्पर्धेसाठी 437 किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या रस्ता कामात दिरंगाई झाल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज’ स्पर्धेसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातील 437 किलोमीटर रस्त्यांची कामं 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदाराला दररोज एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या कामात राजकीय हस्तक्षेप अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी दर्जेदार रस्ते तयार करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलं आहे.
16 देशांचा स्पर्धेत सहभाग
पुणे ग्रँड चॅलेंज या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या लोगो, शुभंकर आणि जर्सीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं. ही स्पर्धा केवळ पुण्यातच नव्हे तर देशात प्रथमच आयोजित केली जात आहे. यासाठी सुमारे 437 किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, स्पर्धा चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेला युसीआय (UCI) या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली असून, 16 देशांतील 24 पथकांनी सहभाग निश्चित केला आहे.
advertisement
रस्त्यांची कामं 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट
या कामांसाठी पुणे महापालिकेला 125 कोटी रुपये, पिंपरी-चिंचवड महापालिकेला 70 कोटी रुपये, पीएमआरडीएला 170 कोटी रुपये, तर पीडब्ल्यूडीला 71 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून आणखी 20 कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
advertisement
या रस्त्यांची कामं 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपाचे प्रयत्न झाल्याचं समोर आलं. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली, असं सूत्रांनी सांगितलं. याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी लोगो अनावरण कार्यक्रमात ठेकेदारांना कानउघाडणी केली आणि कामाचा दर्जा टिकवण्याचा कडक इशारा देण्यात आला.
advertisement
कमी दिवसांत काम पूर्ण करावयाचे असल्याने, रोजच्या कामाचे लक्ष्य ठरविण्यात येणार आहे. ठेकेदारांनी ठरलेल्या वेळेत काम केलं नाही, तर त्यांना दररोज एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: 15 डिसेंबर डेडलाइन! रस्त्यांच्या कामात उशीर झाला तर ठेकेदारांना रोज 1 लाखाचा दंड


