पुणेकरांसाठी खुशखबर! सिंहगड पर्यटकांसाठी कधी सुरू होणार? नवीन तारीख आली समोर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Sinhagad: ऐतिहासिक सिंहगड शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. अतिक्रमण आणि दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर 29 मेपासून प्रवेश बंदी होती.
पुणे : अतिक्रमण कारवाई तसेच धोकादायक दरडी काढण्यासाठी गेल्या आठवड्यापासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यातआला होता. पण आता हे काम पूर्ण झाले असून येत्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. बुधवारपुर्यंत काम पूर्ण करून 5 जूनपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिलीये.
ऐतिहासिक सिंहगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. काही ठिकाणी तर आरसीसी बांधकाम देखील करण्यात आले होते. तर पावसाळ्यात काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे अतिक्रमण हटवणे आणि दरड हटवण्याच्या कामासाठी सिंहगडावर 29 मेपासून पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून पर्यटकांसाठी सिंहगड बंद आहे. आता शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
वन विभागाने सिंहगडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकांमवर कारवाई केली. यामध्ये जवळपास 20 हजार चौरस फुटांवरील बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी गडावर प्रवेश बंदी करण्यात आली होती. आता सर्व कामे बुधवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी 5 जूनलाच सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 04, 2025 10:02 AM IST