पुणेकर चूक महागात पडणार, कचऱ्यासाठी थेट कारवाई होणार, महापालिकेचा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कचऱ्याबाबतची एक चूक आता महागात पडणार असून महापालिका थेट कारवाई करणार आहे.
पुणे : दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत अनेक आस्थापना आणि सोसायट्या नियमांचे पालन करत नाहीत. हीच बाब स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शंभर किलोपेक्षा अधिक ओला कचरा तयार करणाऱ्या सर्व सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण करून, तेथेच कचऱ्यावर प्रक्रिया होत नसेल तर संबंधितांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत.
शहरातील अनेक मोठ्या आस्थापनांकडून 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा तयार होतो, परंतु त्याची विल्हेवाट त्यांच्या आवारात लावली जात नाही. सन 2000 च्या बांधकाम नियमावलीनुसार हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये, तसेच मोठ्या सोसायट्यांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. पुण्यात अशा तब्बल 1942 आस्थापना असून, त्यांच्याकडून दररोज 20 टनांपेक्षा अधिक कचरा प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ही मात्रा अत्यल्प असल्याने पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
advertisement
कौर यांनी निरीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले की, आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व आस्थापनांची नियमित तपासणी करावी, नव्या आस्थापनांचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करावे आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांबाबत कोणत्या अडचणी आहेत, याचा विस्तृत अहवाल सादर करावा. कचरा प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्या आणि संस्थांना तातडीने नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हीही निरीक्षकांची जबाबदारी असेल.
advertisement
धक्कादायक प्रकार समोर
ग्रामीण भागात मिश्र कचरा टाकण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. लोणीकाळभोर येथील वडाळेवस्ती परिसरात वन विभागाच्या जागेत हजारो टन मिश्र कचरा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी हे प्रकरणही गंभीरतेने घेतले आहे. शेतीसाठी ओला कचरा देण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर मिश्र कचरा टाकला जात असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले असून, या प्रकारातील दोषींवर दोन दिवसांत कारवाई केली जाणार असल्याचे कौर यांनी स्पष्ट केले.
advertisement
सध्या शहरात 17 खाजगी संस्था कचरा प्रक्रिया प्रकल्पांना तांत्रिक मार्गदर्शन देत आहेत. प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे येत्या काही दिवसांत ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 10:15 AM IST


