Pune Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का, अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. बाल न्याय मंडळाने या प्रकरणात पोलिसांची याचिका फेटाळली आहे.
Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना बाल न्याय मंडळाकडून (Juvenile Justice Board - JJB) एक मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी करताना, बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांची ती याचिका फेटाळून लावली आहे, ज्यामध्ये अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. याचा अर्थ, बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.
या भीषण अपघात प्रकरणात संबंधित बालगुन्हेगारावर प्रौढ म्हणून खटला चालवावा, असा अर्ज पुणे शहर पोलिसांनी बाल न्याय मंडळात दाखल केला होता. हा अपघात इतका गंभीर होता की, त्यात दोन तरुणांना जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर या प्रकरणाने संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडवली होती. पोलिसांनी आरोपीच्या वयाबद्दल आणि त्याच्या वर्तणुकीबद्दल अनेक पुरावे सादर करत, त्याला प्रौढ मानून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण आहे काय?
ही घटना 19 मे 2024 रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली. एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना धडक दिली. या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील अनीश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुण अभियंतांचा जागीच मृत्यू झाला. पोर्श कार चालवणारा चालक हा अल्पवयीन होता, जो पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघातानंतर तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले होते.
advertisement
अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board - JJB) अवघ्या काही तासांतच त्याची जामिनावर सुटका केली. जामिनासाठी त्याला वाहतुकीचे नियम आणि अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घालण्यात आली होती. या निर्णयामुळे प्रचंड संताप व्यक्त केला गेला होता.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या आजोबांनाही अटक करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांनाही अटक झाली होती.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 15, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का, अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा!


