Insta वरील जाहिरातीने गेम केला; सायबर चोरट्यांकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याची 23 लाखांची फसवणूक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पवार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटशी संबंधित एक आकर्षक जाहिरात पाहिली. त्यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक करताच ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले.
पुणे: शेअर मार्केटमध्ये आकर्षक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे कार्यरत असलेल्या एका उपव्यवस्थापकाची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी अधिकाऱ्याची तब्बल २३ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आकाश दिनेश पवार (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पवार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटशी संबंधित एक आकर्षक जाहिरात पाहिली. त्यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक करताच ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले. या ग्रुपमध्ये 'रंजीव मान' आणि 'ऐश्वर्या राजपूत' अशा बनावट नावांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी आपण ॲडमिन असल्याचं सांगितलं. यानंतर पवार यांना शेअर ट्रेडिंग आणि आयपीओद्वारे (IPO) मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यांनी पवार यांना एक विशिष्ट मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं.
advertisement
2 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत, पवार यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 23 लाख 14 हजार 10 रुपये जमा केले. ॲपवर त्यांना आपल्या गुंतवणुकीवर 83 लाखांहून अधिक नफा झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, जेव्हा पवार यांनी हा नफा काढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सायबर चोरट्यांनी आधी 83 लाख रुपयांच्या नफ्यावर 12 टक्के कर भरावा लागेल, असे सांगितले. नफ्यातून कर वजा करण्याची मागणी पवार यांनी केली असता, कर भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 10:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Insta वरील जाहिरातीने गेम केला; सायबर चोरट्यांकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याची 23 लाखांची फसवणूक










