धक्कादायक! वडिलांच्या 'त्या' त्रासाला कंटाळली; चिठ्ठी लिहित पुण्यातील संजीवनीनं संपवलं आयुष्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील नांदेड गाव परिसरातील जिजाबाईनगर येथे 17 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने वडिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
पुणे : पुण्यातून अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. ज्यात वडिलांच्या त्रासाला कंटाळून एका मुलीनं आपलं आयुष्य संपवलं. पुण्यातील नांदेड गाव परिसरातील जिजाबाईनगर येथे 17 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने वडिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
संजीवनी जीवन रोडे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, मुलीचे वडील जीवन गणपती रोडे (वय ४५) यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील असून, ते मागील दहा वर्षांपासून जिजाबाईनगर येथे वास्तव्यास आहेत. जीवन रोडे यांना दारूचे व्यसन असून, ते वारंवार मुलांना शिवीगाळ करत आणि त्रास देत असत. संजीवनीची आई शीला रोडे या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. २९ सप्टेंबर रोजी सकाळी शीला रोडे नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरी जीवन रोडे आणि त्यांची तीन मुलं होती. दुपारी संजीवनीची मोठी बहीण कामावर गेल्यानंतर संजीवनी, तिचा लहान भाऊ आणि वडील घरी होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शीला रोडे यांना फोनवरून मुलगी संजीवनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
advertisement
घटनास्थळी तपासणी केली असता, पोलिसांना संजीवनीने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत तिने वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट लिहिले आहे. एका शाळकरी मुलीने वडिलांच्या जाचामुळे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसंच या घटनेनं खळबळही उडाली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! वडिलांच्या 'त्या' त्रासाला कंटाळली; चिठ्ठी लिहित पुण्यातील संजीवनीनं संपवलं आयुष्य











