ST Bus: विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ST बस लेट झाल्यास थेट फोन उचलायचा अन्...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
ST Bus: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता बस लेट झाल्यास थेट कारवाई होणार आहे.
पुणे: महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी बस विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही काळात एसटी बस उशिरा धावणे, अचानक रद्द होणे, बस अडथळ्यात अडकणे अशा प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे बऱ्याचदा शैक्षणिक नुकसान देखील होते. याच पार्श्वभूमीवर एसटी महांमडळाने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
एसटीच्या अडचणींमुळे परीक्षांना उशीर होणे, महाविद्यालयात उपस्थिती कमी होणे, शाळा गाठण्यात अडथळे निर्माण होणे यांसारख्या समस्या अधिक भीषण बनल्या आहेत. या वाढत्या तक्रारींचा गंभीरपणे विचार करत एसटी महामंडळाने विशेष पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तक्रारनिवारण हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बस विलंब, रद्द होणे किंवा मार्ग बदल यामुळे विद्यार्थी अडचणीत येत असल्यास ते थेट हेल्पलाइनवर संपर्क साधू शकणार आहेत.
advertisement
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती पोहोचवून विद्यार्थ्यांच्या तक्रारी त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. सरनाईक म्हणाले, “बस उशिरा येण्यामुळे विद्यार्थ्यांचे तास बुडतात, शाळा-कॉलेज सुटते. अनेक ठिकाणी पालकांनी थेट प्रशासनाकडे तक्रारीसह धाव घेतली आहे. आता बस वेळेत धावणे ही संबंधित आगारव्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांची थेट जबाबदारी असेल. गैर व्यवस्थापनामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानासाठी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरावे. तर निलंबन अथवा सक्तीच्या रजेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
चालक-वाहकांना सूचना
राज्यभरातील चालक–वाहकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून शालेय वेळेत कोणतीही एसटी उशिरा न धावणे, बस थांबवून अनावश्यक वेळ दवडू नये, रद्द करावी लागल्यास विद्यार्थ्यांना अगोदर कळवावे अशा स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी, तांत्रिक अडचणी किंवा हवामानामुळे बस उशिरा होण्याची शक्यता असल्यासही विद्यार्थ्यांना आणि पालकांना तत्काळ संदेश पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
advertisement
त्या आगारावर विशेष लक्ष
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हेल्पलाइनवर मिळणाऱ्या तक्रारींचे दररोज विश्लेषण केले जाईल. जिथे समस्या वारंवार आढळतात त्या आगारावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकून चालणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था यांनी या हेल्पलाईनचा योग्य वापर करून बस सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 9:47 AM IST


