पाकिस्तानातील देवी आली सोलापुरात, हिंगुलांबिका देवीबाबत आख्यायिका माहितीये का? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prasad Diwanji
Last Updated:
भारत व पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेली हिंगुलांबिका देवीचं मंदिर सोलापुरात आहे. भवसार समाजाची ती कुलदेवी आहे.
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर: आदिशक्तीची एकूण 51 शक्तीपीठे आहेत. त्यातील पहिले शक्तीपीठ हे हिंगुला देवीचे होय. भारत व पाकिस्तानातील हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले हे शक्तीपीठ पाकिस्तानात असून कराचीपासून वायव्येस 225-250 कि.मी. अंतरावर लासबेला संस्थानात हिंगोल नदीच्या किनार्यावर आहे. हे स्थान सिंधू नदीच्या मुखापासून 122 कि.मी. पश्चिमेस बलुचिस्तान प्रांतात व अरबी समुद्रापासून उत्तरेस 18 ते 20 कि.मी. अंतरावर आहे. नालंदा हिंदी शब्दकोशातही या देवीचा उल्लेख हिंगुला, हिग्गुला, हिंगलाजा, हिंगुलाजा असा आहे. या देवीचे मंदिर सोलापुरातही आहे. याबाबत माहिती मंदिराचे मुख्य पुजारी संजय तुकाराम अंचाटे यांनी दिली.
advertisement
काय आहे आख्यायिका?
भगवान शंकराची पत्नी सती ही प्रजापती दक्ष राजाची मुलगी होती. प्रजापती दक्ष राजाने केलेल्या यज्ञात मुलगी सती व जावई भगवान शंकर यांचा अपमान होतो. अपमानाने क्रोधित झालेल्या सतीने त्या यज्ञातच उडी घेतली. दक्ष राजावर क्रोधित भगवान शंकर पार्वतीचे शव घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे होऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्या ठिकाणी शक्तीपीठे बनली.
advertisement
बलुचिस्तानातील डोंगरावर शिवपत्नीचे ब्रम्हरंध्र (स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू, सिंदूर लावतात तो भाग) पडले. सतीच्या मस्तकावर किंवा ब्रम्हरंध्रावर कुंकू, सिंदूर होते. कुंकवाला संस्कृतमध्ये हिंगुल असे म्हणतात. म्हणून या भागास हिंगोल, हिंगुल, हिंगुलु असे म्हणतात. अग्निपुराणातील अध्याय 12 नुसार व भागवत पुराणातील अध्याय 3 नुसार शिवपत्नी आणि दक्षराजाची कन्या सती हीच अंबिका आहे. अशा प्रकारे हिंगुल+अंबिका या शब्दाच्या एकत्रीकरणातून 'हिंगुलांबिका' या शब्दाची उत्पत्ती झाल्याचे पुजारी सांगतात.
advertisement
भवसार समाजाची कुलदेवी
हिंगुलांबिका देवीचे मूळ स्थान पाकिस्तानात आहे. हिंदू धर्म ग्रंथांतील कथेनुसार येथे विष्णूचे अवतार परशुरामांचे वडील जमदग्नि यांनी घोर तपस्या केली होती. भगवान परशुरामाच्या 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याच्या प्रतिज्ञेमुळे अनेक क्षत्रिय हिंगलाज देवीच्या आश्रयाला गेले. यात राजेही होते. देवीने त्यांना ब्रम्हक्षत्रियत्व देऊन त्यांचे रक्षण केले. अनेक क्षत्रिय या देवीच्या आश्रयाने आपला व्यवसाय बदलून राहत होते. वेगवेगळे व्यवसाय करून जगत होते. ज्या देवीच्या आशीर्वादाने ते क्षत्रिय जिवंत राहीले ती देवी त्यांची कुलदेवता बनली. भव आणि सार राजाच्या नावानं भवसार हा ब्रह्मश्रत्रियत्व मिळालेला भवसार समाज आहे, असेही पुजारी सांगतात.
advertisement
सोलापूरातील भावसार समाज
आपल्या भारताची छोटी प्रतिकृती आपल्याला सोलापूरच्या रूपाने पहावयास मिळते. अनेक जात, धर्म, पंथ व भाषा बोलणारे लोक सोलापूरात कित्येक वर्षापासून गुण्यागोविंदाने राहतात. यात भावसार क्षत्रिय समाजही संघटीतपणे राहात असल्याचे दिसून येते. या शहराच्या औद्योगिक जडणघडणीतही भावसार क्षत्रिय समाजाचा सिंहाचा वाटा आहे. या समाजास धार्मिक दृष्टीने एकत्र ठेवण्याचे कार्य गणेश पेठेतील श्री हिंगुलांबिका देवीच्या माध्यमातून होत आहे. दरवर्षी हिंगुलांबिका देवीचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 7 एप्रिल रोजी देवीचा प्रकटदिन साजरा करण्यात आला.
advertisement
मूर्तीची स्थापना
सोलापूरातील गणेश पेठेत हिंगुलांबिका देवीचे अत्यंत पुरातन मंदिर आहे. पूर्वी या मंदिरात हिंगुलांबिका देवीची पितळेची मूर्ती होती. इ.स. 1898 साली देवीच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. म्हणजेच 125 वर्षापूर्वी या देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. देवीची मूर्ती पंढरपूर तीर्थक्षेत्रातून घडवून आणलेली असून उग्ररूपाची, विविध शस्त्रे धारण केलेली अष्टभूजांची आहे. देवीच्या हातात गदा, ढाल, तलवार, भाला, त्रिशूल, डमरू व कट्यार इत्यादी आयुधे असून डाव्या हातात महिषासुराचे मस्तक धरलेले आहे. पायाने त्या दैत्याचे मर्दन करीत आहे
advertisement
देवीची जुनी मूर्ती धुळ्यात
उग्र स्वरूपाची देवी असल्याने दसर्यामध्ये अष्टमीच्या दिवशी श्री हिंगुलांबिकेपुढे अजाबळी देण्याची प्रथा होती. परंतु गेल्या वर्षापासूनच देवी समोर बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आलेली आहे. शके 1945 ज्येष्ठ कृष्णपक्ष नवमी या दिवशी ( 12 जून 2023 ) रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. देवीची जुनी मूर्ती धुळे येथील मूर्ती संग्रहालयात संशोधनाकरिता पाठविण्यात आलेली आहे, असेही देवीचे मुख्य पुजारी सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 10, 2024 10:53 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पाकिस्तानातील देवी आली सोलापुरात, हिंगुलांबिका देवीबाबत आख्यायिका माहितीये का? Video