दिंडी चालली..! माघ वारीत माऊलींचे अश्व! सोलापुरात गोल रिंगण, कसा असणार दिंडी सोहळा?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Magh Wari 2025: माघ वारीनिमित्त सोलापुरातून दिंडीची 200 वर्षांची परंपरा आहे. आता या दिंडी सोहळ्यात माऊलींचं रिंगण होत असून नुकतंच सोलापूर येथे हा रिंगण सोहळा संपन्न झाला.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर: आषाढी आणि कार्तिकी वारीला माऊलींच्या पालखीत रिंगण सोहळा होत असतो. गेल्या काही काळात माघ वारीत देखील रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू झालीये. नुकतेच माघवारी निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्यांचा एकत्रित रिंगण सोहळा संपन्न झाला. सोलापूर नॉर्थकोट मैदान इथे माऊलींच्या अश्वांचं गोल रिंगण पार पडलं. यावेळी माऊली ‘माऊली’च्या जयघोषणात संपूर्ण परिसर दणाणून निघालं होतं. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे रिंगण सोहळ्याचे हे बारावे वर्ष आहे.
advertisement
200 वर्षांची परंपरा
माऊली... माऊली..., च्या जयघोषात गोल रिंगण सुरू झाले अन् माउलींच्या पालखी सोहळ्यात धावणारे दोन अश्व घावले. माउलींचा जयघोष करीत अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावत 'धन्य आजी दिन संत दर्शनाचा’ हा भाव मनी ठेवत विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी 63 दिंड्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले. माघी दिंडी सोहळा सोलापुरातून जाण्याची परंपरा 200 वर्षांहून अधिक काळाची आहे. शहरातून 38, ग्रामीण मधून 25 दिंड्यांचा सहभाग असतो.
advertisement
कसा झाला रिंगण सोहळा?
महिला व पुरुष वारकरी भाविकांनी उत्साहाने रिंगण सोहळ्यात पाऊल, फुगडी खेळ केले. त्यानंतर गोल रिंगण झाले. पहिले रिंगण ध्वजाधारी भाविकांचे झाले. दिंडीची सुरुवात वैष्णव पताकाने होते. तुळशी वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी रिंगण केले. शेवटी अश्व रिंगण करण्यासाठी कर्नाटक राज्यातील अंकली गावातून आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आले होते. अश्व रिंगण सुरु झाले आणि भाविकांमध्ये चैतन्य संचारले. नॉर्थकोर्ट मैदानावर सर्व वातावरण हे विठ्ठलमय झाले होते. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
advertisement
पुढील रिंगण कुठं होणार?
माघ वारीतील पहिला गोल रिंगण सोहळा सोलापुरात झाला. त्यानंतर पंढरीकडे जाताना दोन मार्ग आहेत. एक तिऱ्हे मार्गे आणि दुसरा मोहोळ मार्गे पंढरीकडे जाता येतं. तिऱ्हे मार्गे जाताना 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पाटकर वस्ती कुरुल येथे रिंगण सोहळा होणार आहे. तिसरा गोल रिंगण सोहळा महात्मा गांधी विद्यालय, पेनूर येथे संपन्न होणार आहे. चौथा गोल रिंगण सोहळा श्री दत्त विद्यालय, सुस्ते, ता. पंढरपूर येथे होणार आहे. 7 फेब्रुवारीला शेवटचं उभं गोल रिंगण पंढरपुरात प्रवेश कराताना जलाराम महाराज मठासमोर होणार असल्याचं सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितलं.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 04, 2025 10:44 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
दिंडी चालली..! माघ वारीत माऊलींचे अश्व! सोलापुरात गोल रिंगण, कसा असणार दिंडी सोहळा?