Gauri Avahana 2025: यंदा गौरी आवाहन कधी, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी? जाणून संपूर्ण माहिती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gauri Avahana 2025: प्रत्येक घरात आपापल्या चालीरिती, कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरांत गणपती बसतो नाही पण गौरी बसतात.
मुंबई : गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरिती, कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरांत गणपती बसतो नाही पण गौरी बसतात.
माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुलं आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने मुखवटा घालतात. काही भागांत मूर्तींची पूजा होते. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजश्रृंगार प्रेमाने करतात.
advertisement
गौरी आवाहन कधी? शुभ मुहूर्त
2025 मध्ये गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी होईल. 1 सप्टेंबरला (सोमवार) ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5.59 ते संध्याकाळी 6.43 वाजेपर्यंत आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन 2 सप्टेंबर 2025 रोजी होईल.
पूजा कशी करावी ?
गौरी आवाहन (दिवस पहिला)
आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुधदुभत्याची जागा दाखविण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणं असे संबोधतात.
advertisement
दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.
advertisement
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात. त्यामुळे घरात समृद्धी येते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे
advertisement
गौरी-महालक्ष्मी-पार्वती, नक्की गणपतीसोबत कोण येते?
गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायकोदेखील मानले जाते. खरंतर गौरी ही गणपतीची आई आहे. तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
advertisement
गणेशोत्सवात कोणत्या चुका करू नयेत
प्रत्येक भाविक बाप्पाची पूजा मनोभावे करत असतो. पूजेदरम्यान कोणीही जाणूनबुजून चूक करत नाही, तर नकळत काही चुका घडतात. घरी बाप्पाची स्थापना करताना आधी गुरुजींना सांगावं आमच्याकडे किती दिवसांचा गणपती आहे आणि मगच बाप्पाची प्रतिष्ठापना करावी. बाप्पाचे मुख पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशांकडेच असेल याची खात्री करावी. बाप्पाचे मुख दक्षिण दिशेकडे चुकूनही ठेवू नये. दररोज गणपतीला फुलं, दुर्वा अर्पण कराव्यात. वस्त्रमाळ घालावी, दररोज नैवेद्य दाखवा. नैवेद्यावर तुळशीचं पान आवर्जून ठेवा. आरती म्हणताना चुका करू नयेत.
advertisement
तसेच गणेशोत्सवात पावित्र्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी अंघोळ करुन स्वच्छ कपडे घालून पूजा करावी. अस्वच्छ कपडे घालून पूजेला बसू नये.
देवघराची स्वच्छता करावी. पूजेच्या आधी देवघराची स्वच्छता करणं आवश्यक आहे.
काळ्या रंगापासून दूर रहा. शुभकार्यात किंवा देवाची पूजा करताना काळे कपडे परिधान करू नये.
देवाला तुळस दाखवू नये. गणेशाची व्रत पूजा करताना तुळशीचा वापर करू नये. पूजेचा प्रसाद बनवताना तुळशीचा वापर करू नये.
जर तुम्ही चतुर्थीचा उपवास केला असेल तर कांदा लसूण खाणं टाळावं, असं म्हटलं जातं. मांसाहार करू नये, मद्यप्राशन करू नये.
गौरी कोणत्या गोष्टी केल्यानं प्रसन्न होते
गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेला सुरुवात करावी. मनोभावे भक्ती करावी. देवीची उत्तरपूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते. उत्तरपूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, चंदन,नारळ, सुपारी आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. फराळाचे पदार्थ, सुका मेवा यांचा नैवेद्य दाखवतात. दिवा, उदबत्ती ओवाळून आरती केली जाते यामुळे गौरीमाता प्रसन्न होते.
गौरी आवाहनावेळी कोणत्या चुका करू नयेत
गौरी आवाहानावेळी स्वच्छता पाळावी. गौरी आवाहनचा मुहूर्त चुकवू नये. नित्यनेमाने पूजा करावी, पूजा करताना चुका करू नयेत. मांसाहार करणे टाळावे आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्यावी.
गौरीच्या नैवेद्यातील पुरण पोळीची रेसिपी
गौरीला प्रामुख्याने पुरणपोळी व कटाच्या आमटीचा नैवेद्य काही भागात दाखवला जातो. पुरणपोळीची रेसिपी जाणून घ्या.
पुरणपोळी बनवण्यासाठी तुम्हाला चणे डाळ, तूप, गूळ, जायफळ पावडर, वेलची पावडर, चवीनुसार मीठ, गव्हाचे पीठ, तेल हे साहित्य लागतं. चणा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 3 तास भिजत ठेवा. कुकरमध्ये भिजवलेली चणा डाळ टाका, त्यात हळद, मीठ, एक चमचा तेल आणि गरजेनुसार पाणी घाला. ते शिजू द्या. डाळ थंड झाल्यावर जास्तीचं पाणी काढा आणि डाळ वाटून घ्या. कढईत वाटण आणि गूळ घालून मिक्स करा. गूळ वितळेपर्यंत दोन्ही चांगले मिसळा. त्यात जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. नंतर हे तयार झालेलं सारण म्हणजेच पुरण थंड होऊ द्या. नंतर गव्हाचे पीठ आणि मैदा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. 15 मिनिटं पीठ बाजूला ठेवा. नंतर त्यापासून गोळे बनवा. त्यात पुरण भरा आणि ते पोळीप्रमाणे लाटून घ्या. नंतर तूप लावून तव्यावर भाजून घ्या. पुरणपोळी तयार झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 29, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gauri Avahana 2025: यंदा गौरी आवाहन कधी, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी? जाणून संपूर्ण माहिती


