Tulsi Upay: मृत्यूसमयी मुखात, कान-कपाळावर तुळस का ठेवतात? का पाळली जाते ही प्रथा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Upay Marathi: भागवत संप्रदायात तुळला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वैष्णव लोक आणि वारकरी तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ तयार करून ती आपल्या गळ्यात ठेवतात.
मुंबई: भगवान विष्णूच्या, कृष्णाच्या आणि पांडुरंगाच्या पूजेच्यावेळी तुळशीचा हार घालतात. भागवत संप्रदायात तुळला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वैष्णव लोक आणि वारकरी तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ तयार करून ती आपल्या गळ्यात ठेवतात. वारकरी महिला पंढरीच्या वारीला जाताना डोक्यावरून पितळेचे वृंदावन नेतात. सर्व देवांच्या पूजेत तुलसीपत्र अर्पण करतात. फक्त गणपतीच्या पूजेमध्ये गणेश चतुर्थीचा दिवस सोडला तर इतर दिवशी तुलसीपत्र अर्पण करण्याची प्रथा नाही. गणेशाने तुलसीला तसा शाप दिल्याची कथा ब्रह्मवैवर्त पुराणातल्या गणेशखंडामध्ये आहे. तुळशी विषयी सविस्तर माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
ब्रह्मकल्पामध्ये तुलसी तीर्थक्षेत्राना भेट देत होती. गंगा नदीच्या काठावर श्रीकृष्णाचे ध्यान करीत बसलेल्या गणेशाकडे तिचे लक्ष गेले. त्याला पाहून तुलसी मोहित झाली. ती गणेशाला म्हणाली-“ गणेशा तू ध्यानधारणा सोड. “ तरीही गणेशाची कृष्णभक्ती व ध्यान चालूच होते. तुलसीने गंगेचे पाणी गणेशावर उडविले. गणेशाने डोळे उघडले. तिच्याकडे पाहून गणेश म्हणाला -“ तू कोण आहेस ? कुठून आलीस ?"
advertisement
तुलसीने सांगितले -“ मी धर्मात्मजाची मुलगी तुळशी आहे. पतिप्राप्तीसाठी मी तपस्या करीत आहे. तू माझा स्वामी हो. “ त्यावर गणेश म्हणाला—“ हे बाई , मला त्या गोष्टीची इच्छा नाही. माझ्या ध्यानधारणेत तू अडथळे आणू नकोस. तू इथून निघून जा. दुसऱ्या कुणाची तरी पती म्हणून निवड कर. “ हे ऐकून तुळशी क्रोधित झाली. त्यावर गणेशाने तिला शाप दिला की तू झाड होशील. “ हा शाप ऐकून तुळशी रडू लागली. त्यामुळे गणेशाला दया आली. गणेश म्हणाला -“ तू पुण्यस्वरूप होशील. नारायणास प्रिय होशील. विशेषकरून श्रीकृष्णाला प्रिय होशील. “ त्यामुळे तुळशी नारायणाला प्रिय झाली. परंतु, गणेशाला अप्रिय झाली. म्हणून तुळस गणेशाला अर्पण करीत नाहीत.
advertisement
माणसाच्या मृत्यू समयी मुखात, कपाळावर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवतात. म्हणजे आत्मा वैकुंठाला जातो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती गावात उपलब्ध रहावी या हेतूमुळे तुळशीचे धार्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. पूर्वी धर्मशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी लोक आचरणात आणीत असत. आज पुराणातील गोष्टींवर लोक विश्वास ठेवतीलच, असे नाही. या वैज्ञानिक युगात विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टीही लोक आचरणात आणतात. म्हणून आयुर्वेदामध्येही तुळशीचे गुणधर्म सांगितले आहेत.
advertisement
तुळशीच्या दर्शनाने पापनाश होतो. सेवनाने रोगनाश होतो. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास पुण्यप्राप्ती होते. तुळशीच्या मुळाशी सर्व तीर्थे, मध्यात ब्रह्मा व अग्रभागी वेदशास्त्रे वास करतात. हिच्या मुळाशी विष्णू व हिच्या छायेमध्ये लक्ष्मी वास करते, अशी श्रद्धा आहे.
तुळशी उपनिषदात तुळशीचा गायत्रीमंत्र दिलेला आहे तो असा—
“ श्रीतुलस्यै विद्महे । विष्णूप्रियाय धीमहि । तन्नो अमृता प्रचोदयात् ॥
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi Upay: मृत्यूसमयी मुखात, कान-कपाळावर तुळस का ठेवतात? का पाळली जाते ही प्रथा


