ज्याने इज्जत वाचवली, त्याच्यावरच उलटले, No Handshake प्रकरणी पाकिस्तानची अब्रू पुन्हा गेली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यात हस्तांदोलन न करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही.
दुबई : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यात हस्तांदोलन न करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, त्यावरून पाकिस्तानच्या टीमने मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं आणि त्यांना हटवण्याची मागणी केली. ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना टॉसच्या काही मिनिटे आधी दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करणार नाहीत, असं सांगण्यात आल्याचं वृत्त ESPNcricinfo ने दिलं आहे.
भारतीय टीम पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाहीत, असं बीसीसीआयने कळवलं. बीसीसीआयने हा निर्णय भारत सरकारकडून मंजुरी घेतल्यानंतर घेतला. पायक्रॉफ्ट यांना टीम इंडियाच्या या निर्णयाबाबत टॉसच्या काही वेळ आधी कळवण्यात आलं. यानंतर पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं.
पायक्रॉफ्टने राखली पाकिस्तानची लाज
पाकिस्तानच्या टीमला याबद्दल माहिती देण्यात आली, तेव्हा पायक्रॉफ्टनी आयसीसीला याबद्दल आधीच कळवायला हवं होतं, असा युक्तिवाद त्यांनी केला. पायक्रॉफ्ट यांनी मात्र आपल्याला यासाठी जास्त वेळ नसल्याचं स्पष्ट केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन न करण्याच्या भारतीय टीमच्या निर्णयाबाबत पाकिस्तानला कळवलं नसतं, तर कदाचित सलमान आघा टॉसनंतर सूर्यकुमार यादवकडे हस्तांदोलन करायला गेला असता आणि त्याचं जगासमोर हसं झालं असतं. हा लाजिरवाणा क्षण टाळण्यासाठी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान टीमला हस्तांदोलन होणार नसल्याचं आधीच सांगितलं.
advertisement
पायक्रॉफ्ट यांच्या या भूमिकेबाबत पीसीबीने नाराजी व्यक्त केली. पायक्रॉफ्ट यांनी आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केलं आहे, तसंच खेळ भावना राखण्यात ते अपयशी ठरले आहेत, असा आरोप पीसीबीने केला. तसंच उर्वरित सामन्यांमधून पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणीही पीसीबीने केली. आयसीसीने मात्र पीसीबीची ही मागणी फेटाळून लावली. यानंतर पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळणार नसल्याचीही धमकी दिली, पण यातूनही त्यांनी यूर्टन घेतला, ज्यानंतर सामना उशिरा सुरू धाला.
advertisement
पाकिस्तानचा यूर्टन
पाकिस्तान-युएई सामना सुरू होण्याआधी काही मिनिटे पीसीबीने एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानचा कर्णधार आणि प्रशिक्षकाची माफी मागितल्याचा दावा केला. हा दावा करताना पीसीबीने एक व्हिडिओही शेअर केला. पण आता या व्हिडिओवरून पीसीबी नव्या वादात अडकली आहे. असा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि शेअर करणे हे आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचं आयसीसीचं म्हणणं आहे. आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पीसीबीला आधीच पत्र लिहिले आहे. आता आयसीसी या मुद्द्यावरून पीसीबीवर कारवाई करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा ठिकाणी मोबाईल आणण्यास परवानगी नाही.
advertisement
हस्तांदोलनाच्या या वादानंतर या दोन्ही टीम पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कपच्या सुपर-4 चा सामना होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 9:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ज्याने इज्जत वाचवली, त्याच्यावरच उलटले, No Handshake प्रकरणी पाकिस्तानची अब्रू पुन्हा गेली!