IND vs PAK : सूर्याने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठे बदल, दोन वाघांचं पाकिस्तानविरुद्ध कमबॅक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला होत आहे.
दुबई : आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या बुमराह आणि वरुण चक्रवर्तीचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंग यांना पुन्हा एकदा टीमबाहेर जावं लागलं आहे. याआधी ग्रुप स्टेजला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही याच प्लेयिंग इलेव्हनसह भारतीय टीम मैदानात उतरली होती. ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता.
मागच्या 14 टी-20 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर 11 वेळा विजय मिळवला आहे, त्यामुळे या सामन्यातही भारतीय टीम विजयाची दावेदार आहे, पण टी-20 फॉरमॅटमध्ये एखादी चांगली ओव्हर मॅचचा निकाल बदलू शकते. ओमानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय बॉलर्सनी निराशाजनक कामगिरी केली होती, त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला चुका टाळाव्या लागणार आहेत.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
advertisement
पाकिस्तानची प्लेयिंग इलेव्हन
सॅम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा, हुसैन तलत, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ, अबरार अहमद
भारत-पाकिस्तान सामन्यात वाद
याआधी ग्रुप स्टेजला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा वाद झाला होता. टॉसवेळी सूर्यकुमार यादवने तर मॅचनंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. मॅच संपल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले, यानंतर टीम इंडियाने ड्रेसिंग रूमचा दरवाजाही बंद केला. भारतीय खेळाडूंच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तिळपापड झाला, तसंच त्यांनी आयसीसीकडे तक्रारही दाखल केली.
advertisement
भारत-पाकिस्तान सामन्याच्या काही वेळ आधी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याला सांगितलं होतं. मॅच रेफरीच्या या वर्तनाचीही पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली. मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट हे पक्षपातीपणे वागले आणि त्यांनी एका टीमची बाजू घेतली, असा आरोप पीसीबीने केला. तसंच ऍन्डी पायक्रॉफ्ट अंपायर असतील, तर आम्ही आशिया कपमध्ये खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. पीसीबीची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. यानंतर युएईविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी टीम बराच वेळ हॉटेलमधून बाहेर पडली नाही.
advertisement
आशिया कपवर बहिष्कार टाकण्याच्या पीसीबीच्या धमकीची हवा पुढच्या काही मिनिटांमध्ये निघाली. आशिया कपमधून माघार घेतली असती, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं जवळपास 140 कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं. तसंच आयसीसीनेही त्यांच्यावर कारवाई केली असती, त्यामुळे पाकिस्तानने युएईविरुद्धचा सामना खेळला, पण हा सामना जवळपास दीड तास उशिरा सुरू झाला.
पुन्हा पायक्रॉफ्टच मॅच रेफरी
advertisement
भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये होत असलेल्या या सामन्यात पुन्हा एकदा ऍन्डी पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी आहेत, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता याबाबत काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान हस्तांदोलनाच्या वादावर आयसीसीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. पायक्रॉफ्ट यांनी याबाबत पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाला टॉसआधी सांगितलं नसतं, तर त्याची जगासमोर अब्रू गेली असती. सलमान आघा हस्तांदलोनासाठी सूर्यकुमार यादवसमोर आला असता आणि सूर्याने त्याला हस्तांदोलन केलं नसतं, तर वाद आणखी चिघळला असता, त्यामुळे मॅच रेफरी म्हणून ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराला याबाबत आधीच कल्पना दिली.
advertisement
भारत-पाकिस्तान रेकॉर्ड
कुलदीप यादव हा मागच्या काही काळापासून पाकिस्तानी टीमसाठी कर्दनकाळ ठरला आहे. फखर झमान कुलदीपविरुद्ध 35 बॉल खेळला असून यात त्याने 30 रन केले, तसंच तो 3 वेळा आऊट झाला. दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यालाही कुलदीपने 12 बॉलमध्ये 6 रनवर 2 वेळा आऊट केलं आहे.
आशिया कपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी मोठे शॉट मारण्याच्या नादात 22 विकेट गमावल्या आहेत. यंदाच्या आशिया कपमधील कोणत्याही टीमचं हे सर्वात वाईट रेकॉर्ड आहे.
advertisement
आशिया कपमधल्या आतापर्यंतच्या 3 सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने 225 च्या स्ट्राईक रेटने 44 बॉलमध्ये 99 रन केले आहेत.
पाकिस्तानच्या टीमने या आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 15 सिक्स मारल्या आहेत, त्यापैकी 6 सिक्स या एकट्या शाहिन आफ्रिदीने लगावल्या आहेत.
कशी असणार खेळपट्टी?
दुबईमधील खेळपट्टी ही नेहमीप्रमाणे संथ आणि कोरडी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्ही टीम स्पिन बॉलिंगवरच जास्त निर्भर राहणार आहेत. तसंच दुबईमध्ये रात्री दव पडण्याची शक्यता असल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग सोपी होते. दुबईमधील रेकॉर्डही चेस करणाऱ्या टीमसाठी अनुकूल आहे. याआधी मागच्या सामन्यातही भारतीय टीम कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तीन स्पिनरसह मैदानात उतरली होती. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनी भारताच्या फास्ट बॉलिंगची जबाबदारी सांभाळली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : सूर्याने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठे बदल, दोन वाघांचं पाकिस्तानविरुद्ध कमबॅक!