Team India : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये वाद! गावसकरांच्या वक्तव्याने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शुभमन गिलला प्लेयिंग इलेव्हन निवडण्याचा अंतिम अधिकार नसल्याचा खळबळजनक दावा भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केला आहे.
मॅनचेस्टर : शुभमन गिलला प्लेयिंग इलेव्हन निवडण्याचा अंतिम अधिकार नसल्याचा खळबळजनक दावा भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केला आहे. प्लेयिंग इलेव्हन निवडण्याचा पूर्ण अधिकार कर्णधाराचा असला पाहिजे, तसंच यावर मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कुणाचाही प्रभाव असता कामा नये, असंही गावसकर म्हणाले आहेत. कुलदीप यादवला इंग्लंड दौऱ्यातल्या 4 टेस्टमध्ये संधी मिळालेली नाही, त्यावर गावसकरांची ही प्रतिक्रिया आली आहे.
'कदाचित शुभमनला शार्दुलऐवजी कुलदीपला टीममध्ये घ्यायचं असेल, अखेर ही टीम कर्णधाराची असते', असं गावसकर म्हणाले. कुलदीप यादवने 2018 साली मॅनचेस्टर आणि लॉर्ड्सवर झालेल्या मर्यादित ओव्हरच्या सामन्यांमध्ये तीन बॉलमध्ये 2 वेळा आऊट केलं होतं. रूटविरुद्ध कुलदीपचं रेकॉर्ड चांगलं असतानाही त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
कुलदीप यादव बॅटिंगमध्ये योगदान देऊ शकत नाही, त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला टीममध्ये घेऊ इच्छित नाही, असं बोललं जात आहे. पण सुनिल गावसकर यांनी मात्र कुलदीपला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली पाहिजे होती, असं वक्तव्य केलं आहे. 'शुभमन गिलला जर टीममध्ये कुलदीप हवा होता, तर त्याला तो मिळायला पाहिजे होता. तो कर्णधार आहे. लोक त्याच्या नेतृत्वाबद्दल बोलणार आहे, त्यामुळे टीममध्ये कुणाला घ्यायचं याचा निर्णय कर्णधाराचा असला पाहिजे', असं गावसकर म्हणाले.
advertisement
'ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही ठीक आहे, हे दाखवण्यासाठी अंतरिक मतभेद किंवा टीम निवडीबद्दलचे मुद्दे जाणूनबुजून लपवले जाऊ शकतात. सगळं काही ठीक आहे हे दाखवण्यासाठी या गोष्टी कदाचित समोर येणार नाहीत, पण सत्य हेच आहे की कर्णधार जबाबदार आहे. तोच प्लेयिंग इलेव्हनचं नेतृत्व करतो. माझ्या कॅप्टन्सीवेळी गोष्टी वेगळ्या होत्या. टीमची निवड हा कर्णधाराचा अधिकार असायचा, तेव्हा कोच नव्हताच कारण सगळं काही मॅनेजर आणि सहाय्यक मॅनेजर पाहायचे', अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.
advertisement
चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने शार्दुल ठाकूरला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी दिली, त्याआधी तिसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डी खेळला होता, पण दोघांनीही बॉलिंगमध्ये फार योगदान दिलं नाही. शार्दुलने तीन इनिंगमध्ये फक्त 27 ओव्हर बॉलिंग केली आणि 2 विकेट घेतल्या. तर रेड्डीने 2 सामन्यांमध्ये 28 ओव्हर बॉलिंग करून 2 विकेट मिळवल्या. तर बॅटिंगमध्ये शार्दुलने 1, 4 आणि 41 रन केल्या आहेत. तर रेड्डीने 1, 1, 30 आणि 13 रनची खेळी केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 27, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये वाद! गावसकरांच्या वक्तव्याने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ









