Jasprit Bumrah : आता लाड चालणार नाहीत! BCCI चा बुमराहबद्दल कठोर निर्णय
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यातील शेवटची टेस्ट स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहशिवाय खेळावी लागली. ओव्हल स्टेडियमवर झालेल्या 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय टीममध्ये नव्हता.
लंडन : टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यातील शेवटची टेस्ट स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहशिवाय खेळावी लागली. ओव्हल स्टेडियमवर झालेल्या 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय टीममध्ये नव्हता. वर्कलोडमुळे बुमराह सीरिजची शेवटची टेस्ट खेळू शकला नाही. 5 टेस्ट मॅचच्या या संपूर्ण सीरिजमध्ये बुमराहचं वर्कलोड चर्चेचा विषय ठरला होता. पण आता बीसीसीआय बुमराहबद्दल मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. जसप्रीत बुमराह जर संपूर्ण सीरिजसाठी उपलब्ध असेल, तरच त्याची निवड करता येईल, असं वृत्त समोर आलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार बीसीसीआय जसप्रीत बुमराहबाबतच्या त्यांच्या सध्याच्या धोरणाचा आढावा घेणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवरून झालेल्या गोंधळामुळे हा आढावा घेतला जात आहे. खरं तर, या मालिकेपूर्वी, बुमराह 5 पैकी फक्त 3 टेस्ट खेळेल अशी घोषणा करण्यात आली होती. पण त्या 3 टेस्ट कोणत्या असतील हे स्पष्ट नव्हते.
advertisement
याचा परिणाम मागच्या 2 टेस्ट सामन्यांमध्ये दिसून आला, जिथे बुमराह मँचेस्टरमध्ये खेळला होता पण त्याला ओव्हलमध्ये विश्रांती घ्यावी लागली. ओव्हलची खेळपट्टी फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल असूनही बुमराह या सामन्यात खेळू शकला नाही. बुमराहबद्दलची ही परिस्थिती आता बीसीसीआयलाही त्रासदायक ठरत आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही टेस्ट सीरिजसाठी टीम निवडीसंबंधी योजना आखणं कठीण होत आहे, कारण बुमराह कोणत्या मॅच खेळेल आणि कोणत्या नाही, याबद्दल स्पष्टता नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
advertisement
बीसीसीआय आता बुमराहला त्याच सीरिजमध्ये निवडण्याचा विचार करेल, ज्यात तो सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असेल. यासाठी मेडिकल टीम आणि स्ट्रेन्थ-कंडिशनिंग कोचिंग टीमवर सगळी जबाबदारी असेल. प्रत्येक सीरिजसाठी टीमची निवड करण्याआधी मेडिकल टीमला बुमराहच्या फिटनेसबाबत खुलासा करावा लागेल. तसंच स्ट्रेन्थ-कंडिशनिंग टीम फिटनेसच्या आधारावर त्याच्या वर्कलोडच्या मर्यादा ठरवेल.
पुढच्या सीरिजसाठी बुमराहला विश्रांती?
बीसीसीआयचे बुमराहबद्दलचे हे धोरण कधी अंमलात आणलं जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. टीम इंडिया आता ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्वी कोणतीही टेस्ट सीरिज खेळणार नाही. भारताची पुढची टेस्ट वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानात होणार आहे, ज्यात 2 टेस्ट मॅच खेळवल्या जाणार आहेत. या सीरिजमध्ये बुमराहला पूर्ण विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 11:35 PM IST


