IND vs NZ : रोहित-विराट-श्रेयस... संक्रांतीला टीम इंडियाची पतंग कापली, न्यूझीलंडच्या पोराचा धडकी भरवणारा स्पेल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पहिल्या वनडेमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली आहे.
राजकोट : पहिल्या वनडेमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली आहे. न्यूझीलंडच्या क्रिस्टियन क्लार्कने टॉप ऑर्डरमधल्या 3 भारतीय बॅटरना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. यातली एक विकेट विराट कोहलीची आहे, जो जवळपास 5 वर्ष वनडे क्रिकेटमध्ये भारताचा नंबर वन बॅटर आहे.
राजकोटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे मॅचच्या सीरिजची दुसरी मॅच खेळली जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला आले. रोहित शर्मा 24 रनवर आणि कर्णधार शुभमन गिल 56 रनवर आऊट झाले. रोहित शर्माची विकेटही क्रिस्टियन क्लार्कने घेतली.
टीम इंडियाचे ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर रन रेट वाढवण्याची जबाबदारी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरवर होती, पण आपली दुसरीच वनडे मॅच खेळणाऱ्या फास्ट बॉलर क्रिस्टियन क्लार्कने एका पाठोपाठ एक विकेट घेऊन भारताला धक्के दिले. क्लार्कने रोहितनंतर श्रेयस अय्यरला 8 रनवर ब्रेसवेलच्या हातातून कॅच आऊट केलं. पुढे क्लार्कने विराट कोहलीला 23 रनवर बोल्ड केलं.
advertisement
केएल राहुलचं शतक
क्रिस्टियन क्लार्कच्या या भेदक स्पेलनंतर केएल राहुलने किल्ला लढवला आणि झुंजार शतक झळकावलं. राहुलच्या या शतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 284 रन केल्या आहेत. राहुलने 92 बॉलमध्ये 112 रनची खेळी केली, ज्यात 11 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. राहुलच्या शतकाशिवाय कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक केलं. 56 रन करून गिल माघारी परतला. न्यूझीलंडकडून क्लार्कला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय काईल जेमिसन, झॅकरी फोल्क्स, जेडेन लेनॉक्स आणि मायकल ब्रेसवेलला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
कोण आहे क्रिस्टियन क्लार्क?
क्लार्कने रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या बॅटिंग पॉवर हाऊसला आऊट करून धमाका केला आहे. क्लार्क हा न्यूझीलंडच्या वाइकाटो भागातील सीम बॉलर आहे. 16 व्या वर्षी त्याला न्यूझीलंडच्या अंडर-19 राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये नॉर्दन डिस्ट्रिक्ट्स टीममध्ये निवडलं गेलं. यानंतर त्याने अंडर-19 राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये 12 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर जुलै 2019 मध्ये क्लार्कची निवड न्यूझीलंडच्या अंडर-19 टीममध्ये झाली. 2020 मध्ये क्लार्क न्यूझीलंडच्या अंडर-19 वर्ल्ड कप टीममध्ये होता.
advertisement
अंडर-19 वर्ल्ड कपच्या चारही सामन्यांमध्ये क्रिस्टियन क्लार्क खेळला होता, पण सेमी फायनलमध्ये बांगलादेशने न्यूझीलंडला बाहेर केलं. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये क्लार्कने 14 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या. यानंतर मार्च 2022 मध्ये क्लार्कने वेलिंग्टनविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू
टी-20 फॉरमॅटमध्ये क्लार्कने 32.9 च्या सरासरीने 79 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट ए मध्ये त्याला 34 सामन्यांमध्ये 52 विकेट मिळाल्या आहेत. फास्ट बॉलिंगशिवाय क्लार्क बॅटिंगही करतो, त्याच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतकही आहे. इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडच्या वनडे टीममध्येही क्लार्कला संधी मिळाली होती. मॅट हेन्री आणि नॅथन स्मिथला दुखापत झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात क्लार्कची न्यूझीलंडच्या टेस्ट टीममध्येही निवड झाली. पण भारताविरुद्धच्या बडोदा वनडेमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
Location :
Rajkot,Gujarat
First Published :
Jan 14, 2026 4:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : रोहित-विराट-श्रेयस... संक्रांतीला टीम इंडियाची पतंग कापली, न्यूझीलंडच्या पोराचा धडकी भरवणारा स्पेल!










