IND vs PAK : भारत-पाकिस्तानला मैदानातला राडा भोवला, सूर्यासह राऊफ-फरहानवर ICC ची ऍक्शन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
IND vs PAK भारत आणि पाकिस्तान यांच्यात 21 सप्टेंबरला दुबईमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. यानंतर बीसीसीआय तसंच पीसीबीने एकमेकांच्या खेळाडूंबद्दल आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 21 सप्टेंबरला दुबईमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला होता. यानंतर बीसीसीआय तसंच पीसीबीने एकमेकांच्या खेळाडूंबद्दल आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची आयसीसीकडून सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीमध्ये पाकिस्तानचे दोन खेळाडू हारिस राऊफ आणि साहिबजादा फरहान यांना ताकीद देण्यात आली आहे. आयसीसीच्या सुनावणीमध्ये दोन्ही खेळाडूंना आचारसंहिता लेव्हल-1 चा गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार हारिस राऊफला मैदानामध्ये विमान पडल्याची नक्कल केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच खेळाची बदनामी केल्याप्रकरणी त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आलं आहे. हारिस राऊफला नेमका किती दंड झाला आहे? याची माहिती अजून समजू शकलेली नाही, पण राऊफच्या मॅच फीचा काही भाग कापण्यात आला आहे.
दुसरीकडे पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहान यालाही लेव्हल 1 चा गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे, त्यामुळे त्यालाही आयसीसीने ताकीद दिली आहे. फरहानने अर्धशतक केल्यानंतर आपली बॅट बंदुकीप्रमाणे चालवली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट राखून पराभव केला होता. या सामन्यात फरहानने 45 बॉलमध्ये 58 रन केल्या.
advertisement
बीसीसीआयने केली होती तक्रार
21 सप्टेंबरच्या सामन्यात साहिबजादा फरहान आणि हारिस राऊफने केलेल्या हावभावांनंतर बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. मैदानावर राजकीय विधाने करण्यास स्पष्टपणे मनाई असतानाही आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर कारवाई व्हावी, अशी मागणी बीसीसीआयने केली होती.
संजू सॅमसनच्या विकेटनंतर रौफने विमान पाडल्याचे हावभाव करत सेलिब्रेशन केलं. तसंच बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना त्याने 6-0 आणि विमान पाडल्याचे हावभाव भारतीय प्रेक्षकांकडे पाहून केले. मे महिन्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पाकिस्तानने भारताची 6 राफेल पाडल्याचा निराधार दावा केला. या खोट्या दाव्याचा आधार घेऊनच हारिस राऊफने चिथावणी दिली. तर फरहानने या सामन्यात अर्धशतक झळकावून बॅटचा बंदुकीसारखा वापर केला.
advertisement
आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन आणि सॅली हिगिन्स यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंसह टीम मॅनेजर नवीन चीमाही उपस्थित होते.
सूर्यकुमार यादवलाही ताकीद
दुसरीकडे पीसीबीच्या तक्रारीनंतर आयसीसीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचीही स्वतंत्र सुनावणी घेतली. सूर्याने 14 सप्टेंबरच्या सामन्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांबद्दल आणि भारतीय सैन्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. तसंच टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलनही केलं नव्हतं, त्यानंतर पीसीबीने टीम इंडिया आणि सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारत-पाकिस्तानला मैदानातला राडा भोवला, सूर्यासह राऊफ-फरहानवर ICC ची ऍक्शन!