कोल्हापूरच्या लेकाचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका; नेमबाजीत सुवर्ण पदकाची अपेक्षा!

Last Updated:

2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यानंतर तो चर्चेत आला. कुवेतमधील एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदकाचा तो मानकरी ठरला.

+
एकदा

एकदा पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा आत्मविश्वासानं तो रणांगणात उतरलाय.

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारतानंही पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये पदकांची कमाई करण्यास सुरूवात केलीये. त्यातच सध्या या स्पर्धेच्या निमित्तानं कोल्हापूरच्या एका सुपुत्राची जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे यानं 50 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये यश मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलंय. 1 ऑगस्ट 2024 रोजी स्वप्निलचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसह सर्व भारतीयांना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.
advertisement
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावाचा स्वप्निलचा जन्म. त्याचे वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि आई अनिता कुसाळे या गावच्या सरपंच. त्यांनी लहानपणापासूनच स्वप्निलला प्रोत्साहित केलं. त्याचा लहान भाऊ सूरज कुसाळे हा क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
advertisement
स्वप्निलचं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचं शिक्षण भोगावती पब्लिक स्कुलमधून घेतलं. याचदरम्यान त्याच्या मनात खेळांविषयी प्रचंड आवड निर्माण झाली. त्यात त्यानं एवढं प्राविण्य मिळवलं की, आज तो जागतिक स्तरावर झळकतोय. हे अत्यंत अभिमानास्पद आहे.
क्रीडा प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून सांगलीत प्रशिक्षण केंद्र मिळालं. त्यानंतर सांगलीमध्येच शिक्षण घेऊन स्वप्निलनं आपलं भविष्य घडवायला सुरूवात केली. केवळ 15-16 वर्षांचा असताना त्यानं नाशिकला जाऊन नेमबाजीचं प्रशिक्षण घेतलं. त्याचं मन मात्र ऑलिम्पिककडेच असायचं. 2008 साली अभिनव बिंद्रांचा खेळ पाहण्यासाठी त्यानं 12वी परीक्षेकडेही दुर्लक्ष केलं होतं. योग्य प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर त्यानं अनेक शालेय स्तरावरील स्पर्धा ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विविध पदकं मिळवली होती. हाच प्रवास सुरू ठेवण्यासाठी 2009 साली त्याचा प्रवेश महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत झाला.
advertisement
2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यानंतर स्वप्निल चर्चेत आला. कुवेतमधील एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदकाचा तो मानकरी ठरला. त्यामुळे भारतीय रेल्वेत तिकीट चेकरची नोकरी त्याला मिळाली. टीसी म्हणून कार्यरत असताना 2018 साली राष्ट्रकुल स्पर्धेत स्वप्निलनं कांस्यपदक मिळवलं. पुढे 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांच्या पात्रता फेरीत अवघ्या 0.03 गुणाने त्याची संधी हुकली होती. मात्र खचून न जाता स्वप्निलनं पुन्हा जोमात तयारी करून 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
advertisement
यासाठी गेल्या 10 वर्षांपासून स्वप्निलकडून कसून सराव करून घेतल्याचं प्रशिक्षिका दिपाली देशपांडे सांगतात. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निलनं सुरुवातीपासूनच चांगलं प्रदर्शन करत गुणांमध्ये सातत्य ठेवलंय. 50 मीटर एअर रायफल गेममध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी स्वप्निलनं पात्रता स्पर्धेत थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये सातव्या स्थानावर राहून 590 गुणांची कमाई केली. एकदा पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा आत्मविश्वासानं स्वप्निल रणांगणात उतरलाय. त्यामुळे अंतिम फेरीत चांगली कामगिरी करून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांसह आई-वडील आणि कांबळवाडी गावानं व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कोल्हापूरच्या लेकाचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका; नेमबाजीत सुवर्ण पदकाची अपेक्षा!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement