MPSC Success Story: 10 गुणांनी पोलीस भरती हुकली, पुन्हा जिद्दीनं लढले, अन् थेट उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी, नाशिकच्या रवींद्र भाबड यांची यशोगाथा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
MPSC मुख्य परीक्षा २०२४ मध्ये विजय लमकणे पहिला, रवींद्र भाबड तिसरा क्रमांक. रवींद्रच्या संघर्षाने राज्यातील तरुणांना प्रेरणा दिली, गरिबीच त्यांचं बळ ठरलं.
MPSC मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर झाला. या निकालाने अनेक तरुणांच्या संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा समोर आणली. या परीक्षेत सोलापूरच्या विजय लमकणे यांनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला, तर नाशिकमधील सिन्नर येथील रवींद्र भाबड यांनी तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होत मोठे यश मिळवलं आहे. त्याच्या या यशाचं नाशिकसह राज्यभरात कौतुक होत आहे. त्यांचा इथवर पोहोचण्याचा संघर्ष सोपा नव्हता. दहा मार्कांनी पोलीस होण्याची संधी हुकलेल्या रवींद्र यांचा हा खडतर प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
आई वडील मजुरी करायचे
रवींद्र भाबड यांचा शैक्षणिक प्रवास एका छोट्या गावातून सुरू झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथे, तर माध्यमिक शिक्षण भोजापूर खोरे हायस्कूल (चास) येथे झाले. परिस्थिती बेताची असल्यामुळे आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांचे आणि दोन्ही बहिणींचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कलेची (Arts) शाखा निवडली, कारण त्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळायचे होते.
advertisement
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झालं. पण त्यांनी हार मानली नाही, त्यांनी छोटी छोटी कामं करायला सुरुवात केली, पार्ट टाइम म्हणून कामं केली. मित्रांची मदत घेतली. या सगळ्यात महत्त्वाचा होता तो विश्वास तो त्यांनी कधीही ढळू दिला नाही. यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो, हाच त्यांचा विजयाचा सर्वात मोठा मंत्र होता.
advertisement
पोलिसांची नोकरी समोर असताना खडतर MPSC चा मार्ग निवडला
रवींद्र भाबड यांनी सुरुवातीला पोलीस भरतीची तयारी केली होती. २०१४ च्या पोलीस भरतीत त्यांचे सिलेक्शन फक्त दहा मार्कांनी हुकलं. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न न करता थेट MPSC साठी तयारी केली. भाबड म्हणाले की "एखाद्या वर्षात पोलीस भरतीत यश मिळवून मी पोलीस शिपाई झालो असतो, चांगली नोकरी मिळाली असती आणि लवकर लग्न करून सेटलही होता आले असतं. पण, तो सोपा मार्ग न निवडता, मी जाणीवपूर्वक एमपीएससीचा खडतर मार्ग निवडला."
advertisement
२०१५ मध्ये त्यांनी एमपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. पहिलं वर्ष त्यांनी नाशिक जिल्ह्यात तयारी केली, पण एमपीएससीचे खरे वातावरण पुण्यात आहे, या जाणिवेने त्यांनी पुण्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि पुढील तीन-चार वर्षे कठोर परिश्रम घेतले.
अपयश म्हणजे शेवट नाही; ते पुढच्या प्रयत्नाची सुरुवात
रवींद्र भाबड यांनी त्यांच्या अभ्यासातील एक महत्त्वाची चूकही सांगितली. "सर्वच परीक्षांची तयारी करणं ही खूप मोठी चूक ठरते. जर आपण सर्वच दगडांवर हात ठेवायला गेलो, तर मग एकाही गोष्टीत आपण यशस्वी होत नाही," असे त्यांचे मत आहे. सुरुवातीच्या काही प्रयत्नांत त्यांना अपयश आले, पण ते निराश झाले नाहीत. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी स्वतःचे विश्लेषण केले आणि आवश्यक सुधारणा केल्या. "अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या प्रयत्नाची सुरुवात असते," या विचारावर ते ठाम राहिले.
advertisement
"माझी गरीब परिस्थितीच माझं सर्वात मोठं बळ ठरली!"
view commentsआज उच्च यश मिळाल्यानंतर रवींद्र भाबड सांगतात की, त्यांची गरिबी त्यांच्यासाठी कधीच शाप ठरली नाही. उलट, "गरीबी ही शिक्षकासारखी असते, ती तुम्हाला वास्तव शिकवते." या विचारानेच त्यांना पुढे जाण्यासाठी बळ दिले. त्यांनी तरुणांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे: "सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींना आपले मित्र बनवा." कोणतीही तक्रार न करता, आपली गरीब परिस्थितीच आपले सर्वात मोठे बळ ठरली, हे सांगायला रवींद्र भाबड विसरले नाहीत. त्यांच्या या संघर्षाने त्यांनी केवळ MPSC मध्ये यश मिळवले नाही, तर हजारो सामान्य कुटुंबातील तरुणांना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
October 31, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
MPSC Success Story: 10 गुणांनी पोलीस भरती हुकली, पुन्हा जिद्दीनं लढले, अन् थेट उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी, नाशिकच्या रवींद्र भाबड यांची यशोगाथा


