फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग गळ्यातल्या चेनचा करणार लिलाव, काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
या लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम 'इन्फ्लेक्शन ग्रँट्स' या धर्मादाय उपक्रमासाठी दान केली जाईल.
फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग सतत काहीनाकाही कारणांमुळे चर्चेत असतात. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या मार्क यांनी आपल्या गळ्यातील गोल्ड प्लेटेड क्युबन लिंक चेन विकण्याची तयारी केली आहे. ही चेन ऑनलाइन लिलावासाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत तिच्यासाठी 40 हजार डॉलर्सची (अंदाजे 33 लाख रुपये) बोली लागली आहे. या लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम 'इन्फ्लेक्शन ग्रँट्स' या धर्मादाय उपक्रमासाठी दान केली जाईल.
पारंपरिक आर्थिक सहाय्य मिळवण्यात असमर्थ असलेल्या व्यक्ती आणि क्रिएटिव्ह प्रकल्पांना इन्फ्लेक्शन ग्रँट्स हा उपक्रम आर्थिक सहाय्य देतो. या अंतर्गत दोन हजार डॉलर्सच्या (अंदाजे 1.6 लाख रुपये) मायक्रो-ग्रँट्स दिल्या जातात. मार्क यांच्या या कृतीतून समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची इच्छा दिसून येते.
लिलावासाठी ठेवण्यात आलेली 6.5 मिमी सोन्याची वर्मील चेन मार्क यांच्या स्टाइलचं प्रतीक मानली जात आहे. लिलावादरम्यान तिचं वर्णन 'कालातीत वारसा' असं केलं गेलं आहे. जी व्यक्ती ही चेन खरेदी करेल तिला टेक जायंटच्या बदलत्या वैयक्तिक स्टाइलचा भाग बनण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे चेनच्या खरेदीदाराला मार्क यांचा एक खासगी व्हिडिओ देखील मिळेल. त्यातून या चेनच्या सत्यतेची खात्री पटेल.
advertisement
या चेनला मार्क यांच्या आयुष्यात भावनिक महत्त्व आहे. मार्क या चेनवर 'मी शेबइराख' (Mi Shebeirach) ही ज्यू प्रार्थना कोरून घेणार आहेत. ते दररोज रात्री आपल्या मुलींसाठी ही प्रार्थना म्हणतात. 'आपल्या आयुष्यात धैर्य बाळगा,' असा संदेश त्यातून मिळतो. या सर्व गोष्टींमुळे मार्क यांची चेन जास्त विशेष ठरत आहे.
झुकरबर्ग हे जगातील चौथे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एकूण 18.56 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. फेसबुकमुळे त्यांना फार कमी वयात यश आणि प्रसिद्धी मिळाली. मार्क यांनी नंतर व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम देखील खरेदी केले. सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या तिन्ही कंपन्या मेटा या पेरेंट कंपनी अंतर्गत कार्यरत आहेत. मार्क यांनी प्रिसिला चान यांच्याशी लग्न केलं असून, या दाम्पत्याला तीन मुली आहेत. या पती-पत्नीने मिळून चॅरिटीसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2024 2:08 PM IST


