अंतराळातून टेन्शन वाढवणारी बातमी, आता लिकेजची समस्या, सुनिता विल्यम्ससह अंतराळवीरांना धोका
- Published by:Suraj
Last Updated:
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या पाच वर्षांपासून आयएसएसमध्ये थोडीशी गळती सुरू होती. मात्र, आता किमान 50 ठिकाणी गळती होत असल्याचं समोर आलं आहे
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) संदर्भात नासाचा एक अहवाल लीक झाला आहे. या अहवालानुसार, आयएसएस धोक्यात आहे. तिथे उपस्थित असलेल्या सुनीता विल्यम्ससह इतर अंतराळवीरांच्या जीवाला धोका असल्याचंही समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून आयएसएसमध्ये थोडीशी गळती सुरू होती. मात्र, आता किमान 50 ठिकाणी गळती होत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय आयएसएसला भेगा देखील पडल्या आहेत.
रशियाने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत मायक्रो व्हायब्रेशन जाणवत असल्याचाही दावा केला आहे. नासाचं म्हणणं आहे की, स्पेस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर येत आहे. हा प्रकार धोक्याची घंटा आहे. तेथील अंतराळवीरांचा जीव वाचवण्यासाठी आणि गळतीची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून आयएसएसमध्ये गळतीची समस्या जाणवत आहे.
स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या यावेझदा मॉड्यूलमधून (Zvezda Module) सर्वांत अगोदर गळती सुरू झाली होती. हे मॉड्युल म्हणजे डॉकिंग पोर्टकडे जाणारा बोगदा आहे. या भागाचं नियंत्रण रशियाकडे आहे. या समस्येचं खरं कारण काय आहे, याबाबत नासा आणि रशियन एजन्सी रॉस्कॉमॉस यांच्यात अद्याप एकमत नाही.
advertisement
सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नासाचे अंतराळवीर बॉब कॅबाना यांनी या गळतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कॅबाना म्हणाले की, गळती थांबवण्यासाठी डागडुजी केल्यास थोड्या काळासाठी फायदा होऊ शकतो. पण, हा कायमस्वरूपीचा उपाय नाही.
अमेरिकेचं म्हणणं आहे की, हा प्रकार सुरक्षित नाही. 2019 मध्ये गळती होत असल्याचं पहिल्यांदा आढळलं होतं. एप्रिल 2024 पासून, दररोज 1.7 किलो दराने हवेची गळती सुरू झाली. आयएसएसमध्ये साधारणपणे सात ते दहा अंतराळवीर राहतात. रशियन इंजिनिअर्सना तिथे मायक्रो व्हायब्रेशन्स जाणवली आहेत. हा धोका टाळण्यासाठी नासाने काही पावलं उचलली आहेत. याशिवाय तिथे उपस्थित असलेल्या अंतराळवीरांनाही अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
सध्या नासाचे सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोन अंतराळवीर आयएसएसमध्ये अडकले आहेत. ते फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत स्पेस स्टेशनवर राहतील. त्यानंतर त्यांंना स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू मोहिमेद्वारे पृथ्वीवर आणलं जाईल. पुढील वर्षाच्या सुरुवातीला स्पेसएक्स क्रू-9 द्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2024 2:32 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
अंतराळातून टेन्शन वाढवणारी बातमी, आता लिकेजची समस्या, सुनिता विल्यम्ससह अंतराळवीरांना धोका


