मुंबईकरांच्या मोठ्या शत्रूला हृदयविकाराचा झटका, कुठं लपला होता मसूद? समोर आली मोठी अपडेट...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maulana Masood Azhar : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि भारताचा मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि भारताचा मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला हृदयविकाराचा झटका आला आहे. मसूद अझहर अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात लपून बसला होता. येथेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात नेण्यात आले. मसूद अझहरला कराचीतील संयुक्त लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
उपचारासाठी खास डॉक्टरांचे पथक रवाना...
दहशतवादी मसूदच्या उपचारासाठी इस्लामाबादमधील हृदयरोगतज्ज्ञही कराचीला पोहोचत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दहशतवादी मौलाना मसूद अझहरला खोस्त प्रांतातील गोरबाज भागातून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. त्याला लवकरच रावळपिंडीतील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज लष्करी रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने दहशतवादी मसूद अझहरला फक्त आश्रयच दिला नसून त्याला भारत विरोधी कारवायांसाठी मोकळं रानही दिले आहे. मसूद हा पाकिस्तानमध्ये स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षही चालवतो.
advertisement
1999 मध्ये दहशतवादी मसूदची सुटका का झाली?
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक मसूद अझहर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सप्टेंबर 2019 मध्ये, भारताने अझहर आणि आणखी एक पाकिस्तानी दहशतवादी, लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज मुहम्मद सईद यांना कडक दहशतवाद विरोधी कायदा UAPA अंतर्गत 'दहशतवादी' म्हणून घोषित केले होते. डिसेंबर 1999 मध्ये, काठमांडू ते कंदाहार या विमानाचे अपहरण करून प्रवाशांच्या बदल्यात सुटका करण्यात आलेल्या दहशतवादी मसूद अझहरने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती.
advertisement
कोण आहे दहशतवादी मसूद अझहर?
दहशतवादी मसूद अझहरचा जन्म 1968 मध्ये झाला होता. त्याचे पूर्ण नाव मौलाना मसूद अझहर आहे. पाकिस्तानात बसून त्याने भारतात अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. तो 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. या दहशतवादी संघटनेने केवळ भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही आपल्या दहशतवादी कारवाया केल्या आहेत. संयुक्त राष्ट्राने या संस्थेला आधीच काळ्या यादीत टाकले आहे. मात्र सर्व निर्बंध असतानाही ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे फोफावत होती. मसूद अझहर हा त्याच्या भारतविरोधी कारवायांसाठी ओळखला जातो. मसूद अझहर आपल्या देशात आहे यावर विश्वास ठेवण्यास पाकिस्तानने वर्षानुवर्षे नकार दिला. मात्र अलीकडेच पाकिस्तानने मसूद अझहरची प्रकृती खराब असून तो पाकिस्तानात असल्याचे मान्य केले होते.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
December 26, 2024 1:30 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
मुंबईकरांच्या मोठ्या शत्रूला हृदयविकाराचा झटका, कुठं लपला होता मसूद? समोर आली मोठी अपडेट...


