लग्नात दारू आणि डीजे नसेल तर मिळणार चक्क 21,000 रुपये, कुठे झाला निर्णय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एका ग्रामपंचायतीने लग्नांमध्ये दारू न ठेवणाऱ्या व डीजे न आणणाऱ्या कुटुंबांना 21,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
भारतात लग्न समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने होतात. काही राज्यांमध्ये लग्न समारंभात पाहुण्यांसाठी दारू ठेवली जाते. तर लग्नात डीजे वाजवणं हे बहुतांश राज्यांमध्ये पाहायला मिळतं. दारू व डीजेमुळे बरेचदा लग्नांमध्ये भांडणं होतात व शुभकार्यात विघ्न येतं. पंजाबमध्ये लग्नात मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन केलं जातं, तसंच डीजे देखील असतो. पंजाबमध्ये एका गावाने लग्नातील अवाजवी खर्च टाळण्यासाठी व लग्न सोहळे शांततेत पार पडावे यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने लग्नांमध्ये दारू न ठेवणाऱ्या व डीजे न आणणाऱ्या कुटुंबांना 21,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बल्लो असे या गावाचे नाव आहे. गावातील सरपंच अमरजित कौर यांनी मंगळवारी याबद्दल माहिती दिली. गावकऱ्यांनी लग्नात होणारा फालतू खर्च टाळावा व दारूपासून दूर राहावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
मिळेल 21,000 रुपयांचे बक्षीस
दारू व डीजेवर खर्च होणाऱ्या पैशांची बचत व्हावी व दारूचं सेवन कमी व्हावं, शांततेत लग्न सोहळे पार पडावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीतील सदस्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये होणारा अवाजवी खर्च आणि उच्च डेसिबल आवाजामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता या नवीन उपक्रमामुळे लग्न सोहळे शांततेत प्रेमाने साजरे करतील, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, अशी आशा आहे. यापुढे लग्नसोहळे हे प्रेम व आनंद देणारे सोहळे ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
advertisement
लग्न समारंभ शांततेत व्हावे
गावात लग्न सोहळ्यात पाहुण्यांसाठी दारू मागवली जाते आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवला जातो. काही वेळा अशा प्रसंगात भांडणं देखील होतात. डीजेच्या आवाजामुळे मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. लग्न समारंभ शांततेत व्हावे, असा या निर्णयामागचा हेतू आहे, असं सरपंचांनी सांगितलं. ग्रामपंचायतीने एक ठराव मंजूर केला आहे, त्याअंतर्गत लग्न समारंभात जे कुटुंब दारूची सोय करणार नाही व डीजे वाजवणार नाही, त्यांना 21,000 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देईल. बल्लो गावाची एकूण लोकसंख्या पाच हजार आहे. या उपक्रमाचा उद्देश गावकऱ्यांना दारू आणि अवाजवी खर्चापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे, जेणेकरून विवाह सोहळे शांततेत पार पडतील, असं सरपंचांनी सांगितलं.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
January 09, 2025 1:38 PM IST