ना वैर, ना द्वेष, फक्त शिव्यांचा खेळ! 'बोरीचा बार'मागे दडलंय दोन सवतींच्या भांडणाचं रहस्य; जाणून घ्या अनोखी परंपरा!

Last Updated:

खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी गावांमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी 'बोरीचा बार' ही एक विचित्र पण अनोखी परंपरा पाळली जाते. यात दोन्ही गावांच्या महिला...

Bori Bar Tradition
Bori Bar Tradition
सातारा : खंडाळा तालुक्यात वसलेल्या सुखेड आणि बोरी गावांमध्ये दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एक अशी परंपरा पार पडते, जी ऐकणाऱ्याला अचंबित करते. या परंपरेचे नाव आहे 'बोरीचा बार'. यात दोन्ही गावांतील महिला ओढ्याच्या पाण्यात समोरासमोर उभ्या राहून एकमेकींना मनसोक्त शिव्यांची लाखोली वाहतात. ही प्रथा वरकरणी विचित्र वाटत असली, तरी तिच्या मुळाशी एक जुनी आख्यायिका आणि सामाजिक सलोख्याचा अनोखा संदेश दडलेला आहे.
दोन्ही गावच्या महिला देतात एकमेकींना शिव्या
यावर्षीही तीच परंपरा, तोच उत्साह आणि तोच जल्लोष कायम होता. दुपारच्या सुमारास सुखेड गावच्या महिला डफ, ताशे आणि शिंगाच्या गजरात ओढ्याच्या काठावर दाखल झाल्या. त्यांच्यापाठोपाठ बोरी गावच्या महिलाही तितक्याच तयारीनिशी या उत्सवात सामील झाल्या. ओढ्याच्या पाण्यात उतरताच दोन्ही गावांच्या महिलांनी एकमेकींना आव्हान देत शिव्यांचा वर्षाव सुरू केला. हातवारे, आरोळ्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा थरारक सोहळा 'याचि देही, याचि डोळा' अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या बघ्यांची अलोट गर्दी जमली होती. त्यातच धोम-बलकवडी धरणाचे पाणी ओढ्यात सोडल्यामुळे या वातावरणात आणखीनच रंगत आली.
advertisement
महिलांना आवर घालताना पोलिसांनी धांदल उडाली
महिलांचा उत्साह इतका अनावर होता की, त्यांना आवर घालताना पोलीस आणि ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली. पोलिसांनी वाद्ये बंद करण्याचा प्रयत्न केला, पण महिलांनी कुठेही न थांबता, केवळ टाळ्या आणि हातवारे यांच्या साहाय्याने आपला 'बार' सुरूच ठेवला. दोन्ही बाजूंच्या महिलांना रोखण्यासाठी पोलिसांनी दोरीचा आधार घेतला, पण तरीही महिलांनी सुमारे 100 फूट अंतरावरून एकमेकींकडे हातवारे करत ही परंपरा पूर्ण केलीच.
advertisement
या अनोख्या 'बारा'नंतर दोन्ही गावांमध्ये झिम्मा, फुगडी आणि फेर धरण्यासारखे पारंपरिक खेळ रंगले. सुखेडच्या माळावर तर जणू जत्रेचेच स्वरूप आले होते; तिथे पाळणे, मिठाई आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती, जिथे मुलांचा किलबिलाट आणि आनंद ओसंडून वाहत होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणंद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
काय आहे यामागची आख्यायिका?
'बोरीच्या बार'मागे एक जुनी कथा सांगितली जाते. पूर्वी बोरी गावच्या पाटलाला दोन बायका होत्या; एक सुखेडमध्ये, तर दुसरी बोरी गावात राहायची. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी त्या दोघी ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्याच वादात त्या दोघी पाण्यात बुडून मरण पावल्या. त्यांच्याच स्मरणार्थ आणि त्या वादाचे प्रतीक म्हणून ही परंपरा आजही जपली जाते. ही परंपरा काहींना श्रद्धा वाटते, तर काहींना अंधश्रद्धा. पण यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून, यातून गावातील एकोपा, सांस्कृतिक चैतन्य आणि महिलांचा सामाजिक सहभाग यांचे दर्शन घडते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
ना वैर, ना द्वेष, फक्त शिव्यांचा खेळ! 'बोरीचा बार'मागे दडलंय दोन सवतींच्या भांडणाचं रहस्य; जाणून घ्या अनोखी परंपरा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement