Kolhapur News: मेलेली संजना जिवंत परतली! मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? पोलिसांसमोर मोठा पेच!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जयसिंगपूर तालुक्यातील उदगाव येथे एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. 19 जुलैपासून बेपत्ता असलेली संजना ठाणेकर ही महिला रक्षा विसर्जनाच्या...
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) मध्ये एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे पोलीसही गोंधळात पडले आहेत. उदगाव येथील बेपत्ता झालेली एक महिला परतली आहे, पण तिच्यावर अंत्यसंस्कार मात्र आधीच झाले होते! यामुळे रक्षा विसर्जनाच्या दिवशीच ती महिला गावात परतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्यात आलेली ती मृत महिला नेमकी कोण होती, याचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद, पण...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगाव येथील महेश महादेव ठाणेकर (वय-38) यांची पत्नी संजना ठाणेकर (वय-37) या 19 जुलैपासून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी 23 जुलै रोजी जयसिंगपूर पोलिसांत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर, 29 जुलै रोजी मंगळवारी मिरज तालुक्यातील बामणी येथील कृष्णा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिरज पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांना दिली.
advertisement
पतीने मृतदेहाची ओळख पटवली अन् अंत्यसंस्कार झाले
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी महेश ठाणेकर मिरज शासकीय रुग्णालयात गेले. नदीत सापडल्यामुळे मृतदेहाचा चेहरा फुगलेला असल्याने ओळखणे कठीण होते. मात्र, महेश ठाणेकर यांनी मृतदेहावरील कपडे, गालावरील तीळ आणि इतर खुणांवरून तो मृतदेह आपल्या पत्नी संजनाचाच असल्याची खात्री केली. त्यानंतर तो मृतदेह ठाणेकर यांच्या ताब्यात देण्यात आला आणि मंगळवारी रात्री उदगाव येथील वैकुंठ धामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
...आणि सर्वांनीच डोक्याला हात लावला
बुधवारी (30 जुलै) सकाळी उदगावच्या वैकुंठ धामात रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याच दिवशी, बुधवारी दुपारी संजना ठाणेकर बचत गटातील पैसे भरण्यासाठी उदगावमध्ये आल्या! त्यांना पाहताच गावात एकच खळबळ उडाली. मात्र, त्या लगेचच तिथून निघून गेल्या. ही माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने तपास यंत्रणा कामाला लावली. अखेरीस, प्रत्यक्ष संजना ठाणेकर पोलीस ठाण्यात हजर झाल्या, तेव्हा उपस्थित सर्वांनीच डोक्याला हात लावला.
advertisement
या प्रकरणी पोलीस अधिकारी सत्यवान हाके यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात हजर झालेल्या संजना ठाणेकर यांनी आपण तासगाव आणि बारामती येथे गेल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, ती दुसरीच कोणीतरी महिला होती हे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक घटनेचा तपास आता मिरज ग्रामीण पोलिसांकडून केला जाणार आहे.
advertisement
हे ही वाचा : Nagpur News: 'लुटेरी दुल्हन' समीराने 8 जणांना घातला 2 कोटींचा गंडा; मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल चकित!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2025 8:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kolhapur News: मेलेली संजना जिवंत परतली! मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? पोलिसांसमोर मोठा पेच!