Strange Tradition: लग्नाआधी व्हावं लागतं आई , नाहीतर मुली नवरा बदलतात; या ठिकाणी विचित्र प्रथा!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
भारतात विविध जाती-जमाती आणि त्यांच्या विविध संस्कृतीही आहेत. त्या प्रत्येक संस्कृतीमध्ये लग्नाबाबतच्या प्रथा आणि पद्धती वेगळ्या आहेत. जुन्या काळात असलेली स्वयंवर पद्धत आजही काही गावांमध्ये पाळली जाते.
नवी दिल्ली : भारतात विविध जाती-जमाती आणि त्यांच्या विविध संस्कृतीही आहेत. त्या प्रत्येक संस्कृतीमध्ये लग्नाबाबतच्या प्रथा आणि पद्धती वेगळ्या आहेत. जुन्या काळात असलेली स्वयंवर पद्धत आजही काही गावांमध्ये पाळली जाते. त्यानुसार आवडलेल्या नवऱ्यासोबत लिव्ह इनमध्ये राहून नंतर त्याच्याशी लग्न केलं जातं.
लिव्ह इन पद्धतीवर अनेक वाद झाले, अजूनही होत आहेत. त्यावर कायद्याचीही मदत घेण्यात आली. अनेक धार्मिक, सामाजिक संस्था लिव्ह इनला सातत्यानं विरोध करत आहेत; मात्र देशातल्या दोन राज्यांमध्ये असलेली काही गावं आजही लग्नासाठी स्वयंवर पद्धत अवलंबतात. त्यामध्ये मुली त्यांच्या आवडीच्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहतात. त्यांच्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे. मुली त्यांचे जोडीदार बदलूही शकतात. म्हणजेच जोडीदार आवडला नाही, तर दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकतात.
advertisement
शहरी भागात लिव्ह इनची चर्चा आत्ता होऊ लागली; मात्र आदिवासी भागात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. राजस्थानातल्या उदयपूर, सिरोही आणि पाली जिल्ह्यात, तसंच गुजरातमधल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या गरासिया जातीमध्ये लिव्ह इन पद्धत रूढ आहे. या जातीमधल्या स्त्रियांना लग्नाआधी आवडत्या पुरुषासोबत राहण्याचं स्वातंत्र्य असतंच, शिवाय त्या आईही बनू शकतात. तरीही त्यांना जोडीदार आवडला नाही, तर त्या दुसऱ्या पुरुषाशी लग्न करू शकतात. यामुळे त्यांना स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडण्यास मदत मिळते.
advertisement
गरासिया जातीमधल्या स्त्रियांना त्यांच्या आवडीचा पुरुष जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्यात लग्नाचे विधी दोन दिवस सुरू असतात. त्यात तरुण पुरुष आणि स्त्रिया एकत्र येतात व आवडीच्या जोडीदारासोबत राहू लागतात. लग्न न करताही ते विवाहित दाम्पत्याप्रमाणे राहू शकतात. ते जेव्हा गावी परततात, तेव्हा त्यांचे आई-वडील त्यांचं दिमाखात लग्न लावून देतात; मात्र त्यांच्यावर लग्नासाठी दबाव नसतो. ते लग्न न करताही एकमेकांसोबत राहू शकतात.
advertisement
गरासिया समाजातल्या लिव्ह इन पद्धतीबाबत असं सांगितलं जातं, की एकदा या समाजातले चार भाऊ दुसऱ्या शहरांमध्ये राहायला गेले. त्यांच्यातल्या तिघांनी सामान्य हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं, तर चौथा लिव्ह इनमध्ये राहिला. कालांतरानं त्या तिघांना मूलबाळ झालं नाही; मात्र लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या त्या चौथ्या भावाला एक मूल झालं. तेव्हापासून गरासिया समाजात लिव्ह इनची पद्धत रूढ झाली.
advertisement
या समाजात स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त उच्च दर्जा असतो. या समाजात हुंडाबळीची प्रकरणं घडत नाहीत. लग्नाची तयारी वधू व वरपक्ष दोघंही एकत्रितपणे करतात; पण खर्च संपूर्णपणे मुलाचे कुटुंबीय करतात. त्यामुळे लग्नही मुलाच्या घरीच होतं. दोघं लिव्ह इनमध्ये राहायला लागल्यावर मुलाचे कुटुंबीय मुलीकडच्यांना काही पैसे देतात. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. आता काही जण नोकरी-व्यवसायही करू लागले आहेत. तसंच हे लोक शहरातही स्थायिक होऊ लागले आहेत.
advertisement
गरासिया समाजात एक दापा पद्धत आहे. त्या अंतर्गत दोन दिवसांसाठी लग्नमेळा भरतो. तिथे स्त्रिया त्यांच्या आवडीच्या पुरुषाची निवड करतात व पळून जातात. परत आल्यावर ते लिव्ह इनमध्ये राहू लागतात. पुरेसे पैसे कमावल्यावर ते दोघं लग्न करतात. लग्नासाठीची महत्त्वाची अट ही असते, की लिव्ह इनमध्ये राहताना त्यांना आई-वडील बनावं लागतं. मूल जन्माला घातलं नाही, तर ते लग्न करू शकत नाहीत. मग ते दोघं वेगळे होतात व महिला दुसऱ्या पुरुषाला जोडीदार म्हणून शोधतात.
advertisement
भारतात अशा काही गावांमध्ये फार पूर्वीपासून लिव्ह इन पद्धत अस्तित्वात होती. त्यामागची कारणं त्या त्या समाजानुसार वेगवेगळी होती. त्यामुळे लिव्ह इन पद्धतीवर सरसकट टीका करता येऊ शकत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 23, 2024 6:51 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Strange Tradition: लग्नाआधी व्हावं लागतं आई , नाहीतर मुली नवरा बदलतात; या ठिकाणी विचित्र प्रथा!