पटापट अर्ज करा अन् सरकारकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रु मिळवा! वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Tractor Anudan Yojana : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कृषी क्षेत्रात मोठी मदत ठरू शकणारी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जात आहे.
नाशिक : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कृषी क्षेत्रात मोठी मदत ठरू शकणारी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबत लागणाऱ्या उपसाधनांच्या खरेदीसाठी गटांना भरघोस अनुदान देण्यात येणार आहे.
ही योजना खास करून शेतीशी निगडित आणि ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. शेतजमिनीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेले मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी साधने खरेदी करण्यासाठी सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
अनुदानाचे स्वरूप व मर्यादा
योजनेअंतर्गत लाभार्थी गटांना 9 ते 18 एचपी क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व त्यासोबतचे साधन खरेदी करता येणार आहे. एकूण खरेदी खर्चाची मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आली असून, त्यावर 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत शासकीय अनुदान मंजूर केले जाईल. उर्वरित 35 हजारांचा खर्च संबंधित गटाने करावा लागेल.
advertisement
अर्ज करण्याच्या अटी नियम काय आहेत?
अर्जदार स्वयंसहाय्यता बचत गट महाराष्ट्रातील नोंदणीकृत गट असणे आवश्यक आहे. गटातील अध्यक्ष, सचिव आणि किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना गटाची नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, प्रत्येक सदस्याचे जातीचे दाखले, बँक खात्याचे तपशील, तसेच खरेदी करावयाच्या साधनांचा अंदाजित खर्च यांची माहिती देणे आवश्यक आहे. अर्जदार गटाने शेतीशी संबंधित कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असावा.
advertisement
अर्ज करण्याची अंतिम मुदत
या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक बचत गटांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने केले आहे.
दरम्यान, योजनेविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत अधिकृत माहिती मिळू शकते.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
June 07, 2025 1:52 PM IST