हळदीवर कंद माशीचा प्रादुर्भाव? असं करा नियंत्रण, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बऱ्याच ठिकाणी लांबून राहिलेला अतिपाऊस, त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि सध्याच्या कडक थंडीत वातावरणामुळे सध्या हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सांगली: यंदा वेळेआधी सुरू झालेला अवकाळी पाऊस उशिरापर्यंत कोसळत राहिला. यामुळे बर्याच ठिकाणी हळद लागवडी लांबणीवर पडल्या होत्या. परिणामी सद्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी लांबून राहिलेला अतिपाऊस, त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि सध्याच्या कडक थंडीत वातावरणामुळे सध्या हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी, होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे नियंत्रण कसे करावे? याविषयी हळद संशोधक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
कंदकुज नियंत्रण
कंदकुज रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
advertisement
कंदकुज झाली असल्यास जमिनीतून कार्बेनडाझिम (50%) 1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (75 टक्के) 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड (50 टक्के) 5 ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून महिन्यातून एकदा आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीमध्ये वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा, पाणी लांबणीवर टाकावे.
advertisement
कंदमाशीचे नियंत्रण
प्रत्येक 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (25 % प्रवाही) 20 मि.ली. किंवा डायमिथोएट (30% प्रवाही) 15 मि.ली. यापैकी एका कीडनाशकाची प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी आणि सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे.
advertisement
जमिनीतून क्लोरपायरीफॉस (40 टक्के) 50 मि.लि प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीडनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी. एकरी 2-3 पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी 200 ग्रॅम घेऊन त्यात 1 ते दीड लिटर पाणी घ्यावे. 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 7:04 PM IST







