ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन झटपट नोंदणी कशी करायची?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News :राज्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपली ई-पीक पाहणी तत्काळ पूर्ण करून घ्या, अन्यथा शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
१०० टक्के ई-पीक पाहणीचे सरकारचे उद्दिष्ट
राज्य सरकारने यंदा १०० टक्के ई-पीक पाहणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑगस्ट महिन्यात या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. प्रारंभी शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवरून ई-पीक पाहणी करण्याची सुविधा देण्यात आली. मात्र, पहिल्या काही आठवड्यांत नेटवर्क अडचणी, ॲपवरील तांत्रिक त्रुटी आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे पाहणीमध्ये अडथळे आले. यानंतर सहाय्यक स्तरावरील पाहणीस सुरुवात झाली. परंतु अलीकडील अवकाळी पाऊस, पूरस्थिती आणि पिकांचे नुकसान यामुळे काही भागांतील पाहणी अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
advertisement
राज्यातील पाहणीची सद्यस्थिती
राज्यात खरिप हंगामात एकूण १४४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यापैकी १०८ लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक नोंद पूर्ण झाली आहे. सहाय्यक स्तरावरील पाहणी १ ऑक्टोबरपासून सुरू आहे. आधी यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती, परंतु आता ती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पिक पाहणीची प्रक्रिया कशी होते?
सहाय्यक महसूल कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची पाहणी करतात. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी त्या पाहणीची शंभर टक्के तपासणी करतात. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ती माहिती ७/१२ उताऱ्यावर नोंदवली जाते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण होते आणि शासकीय योजनांमधील पारदर्शकता वाढते.
advertisement
मोबाईलवरून झटपट ई पीक पाहणी कशी करावी?
शेतकऱ्यांसाठी आता मोबाईलवरून स्वतः ई-पीक पाहणी करणे अत्यंत सोपे झाले आहे.
सर्वात आधी "Mahabhumi" किंवा "E-Peek Pahani" हे अधिकृत अॅप डाउनलोड करा. (हे अॅप Google Play Store वर मोफत उपलब्ध आहे.) अॅपमध्ये आपला मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून लॉगिन करा. तुमच्या ७/१२ उताऱ्याशी संबंधित सर्वेक्षण क्रमांक (गट नंबर) निवडा. पिकाचे नाव, क्षेत्रफळ आणि पिकाची स्थिती (उदा. अंकुरावस्था, फुलावस्था इ.) निवडा. शेताचा फोटो काढून अपलोड करा. फोटोमध्ये पिक स्पष्ट दिसले पाहिजे. माहिती भरल्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा. प्रणाली तुमच्या नोंदीची पुष्टी करते आणि ई-पीक पाहणीची नोंद पूर्ण होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 8:54 AM IST


