शेवगा महागला, जालन्यात किलोला मोजावे लागतायत 400 रुपये, कारण काय?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
थंडीचा कडाका वाढल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर हे कडाडले आहेत.
जालना : थंडीचा कडाका वाढल्याने भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर हे कडाडले आहेत. शेवगा तर 400 रुपये प्रति किलो पेक्षाही जास्त भावाने विक्री होत आहे. जालना शहरातील भाजीपाला बाजारात शेवग्याला 400 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. तर राज्यातील विविध शहरांमध्ये शेवगा 400 ते 600 रुपये प्रति किलो या दरम्यान विक्री होत आहे. पाहुयात काय आहेत शेवग्याच्या दरवाढीमागील कारणे.
थंडीचा कडाका वाढल्याने शेवग्याच्या झाडांना फुलधारणा फार कमी प्रमाणात होत आहे, त्यामुळे स्थानिक शेवगा बाजारात विक्रीसाठी येतच नाहीये. बंगळूर, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमधून फार कमी प्रमाणात शेवग्याची आवक होत आहे. यामुळे शेवग्याला 400 ते 500 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या शेवग्याची भाजी आवाक्याबाहेर गेली असून केवळ हॉटेल व्यावसायिक शेवग्याच्या शेंगा खरेदी करत आहेत, असं जालन्यातील व्यापारी मोहसीन अली यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
दरम्यान, पुढे गारठा कसा राहतो यावर शेवग्याचे भाव ठरतील. थंडीचा कडाका असाच कायम राहिल्यास पुढील किमान दोन महिने तरी शेवग्याचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट दरामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना पुढील दोन महिने तरी शेवग्याची भाजी खाणं हे दिवसा स्वप्न ठरण्याची शक्यता आहे. शेवग्याच्या शेंगेमध्ये असलेल्या विविध गुणधर्मामुळे काही लोक मात्र शेवग्याचे भाव कितीही कडाडले तरी आवर्जून खरेदी करतात, असं व्यापाऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 09, 2025 12:18 PM IST








