IND VS PAK : मसाल्याच्या पदार्थांपासून ते कांद्यापर्यंत! भारत-पाक तणावाचा निर्यातीला फटका, किंमती भडकणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : भारताची कापूस, कांदा, साखर, मसाले, सोयाबीन पेंड, हळद, आणि इतर कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणात आखाती देशांना निर्यात केली जातात. यासाठी पाकिस्तानमार्गे रस्तामार्गाने माल पाठवणं अधिक सोयीचं ठरतं.
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला असून, याचा थेट परिणाम भारताच्या शेतीमाल निर्यातीवर होत आहे. पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तान तसेच आखाती आणि मध्य आशियातील (पूर्वीच्या सोवियत संघातील) देशांमध्ये होणारी निर्यात सध्या पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी, भारतातील निर्यातदारांना आता शेतीमाल इतर पर्यायी आणि लांब पल्ल्याच्या मार्गाने पाठवावा लागत आहे, ज्यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे.
शेतीमाल निर्यातीसाठी पाकिस्तानमार्गे सोयीचा मार्ग
भारताची कापूस, कांदा, साखर, मसाले, सोयाबीन पेंड, हळद, आणि इतर कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणात आखाती देशांना निर्यात केली जातात. यासाठी पाकिस्तानमार्गे रस्तामार्गाने माल पाठवणं अधिक सोयीचं ठरतं, कारण या मार्गाने वाहतुकीचा कालावधी कमी असतो आणि खर्चही तुलनेत कमी येतो. भारतातून माल प्रथम पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवला जातो आणि तेथून तो इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत, बहारीन, जॉर्डन आणि इतर आखाती देशांमध्ये वितरित होतो. दुसऱ्या मार्गाने कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यांसारख्या मध्य आशियाई देशांपर्यंतही पोहोचतो.
advertisement
व्यापारी मार्ग बंद, निर्यातदार चिंतेत
सध्या भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारी मार्ग बंद केला आहे. वाघा-अटारी सीमेवरील वाहतूक पूर्वीच थांबवण्यात आली आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानला वगळून शेतीमालाची निर्यात समुद्रमार्गाने किंवा इतर पर्यायी लांब मार्गाने करावी लागत आहे. यामुळे वाहतूक वेळ वाढतो, निर्यात खर्च वाढतो आणि वेळेवर माल पोहोचवणंही कठीण होतं. अनेक निर्यातदारांनी याविषयी चिंता व्यक्त केली असून, जागतिक बाजारात स्पर्धा टिकवून ठेवणं कठीण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
advertisement
भारत-पाकिस्तान व्यापार थांबला
भारत पाकिस्तानला कापूस, मसाले, भाजीपाला, चहा, डेअरी उत्पादने आणि तेलबियांचे पदार्थ निर्यात करतो. तर पाकिस्तानकडून भारतात काजू, खजूर, मीठ, लोकर आणि फळं यांची आयात केली जाते. परंतु सध्याच्या युद्धसदृश वातावरणामुळे हा द्विपक्षीय व्यापार पूर्णतः ठप्प झाला आहे. याचा फटका दोन्ही देशांतील व्यापार आणि कृषी अर्थव्यवस्थेला बसत आहे.
बासमती तांदळाच्या दरात झपाट्याने वाढ
भारत आणि पाकिस्तान हे बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक देश आहेत. जागतिक बाजारात या दोन्ही देशांच्या तांदळाला मोठी मागणी आहे. मात्र सध्या पाकिस्तानमार्गे होणारा तांदळाचा पुरवठा अडथळ्यात आल्याने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी भारताकडे मोर्चा वळवला आहे. सौदी अरेबिया, इराण, येमेन यांसारख्या देशांनी भारतातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ खरेदी सुरू केली आहे. अमेरिकन खरेदीदारही आगामी टॅरिफ वाढीच्या पार्श्वभूमीवर आधीच खरेदी करून साठा तयार करत आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सतत घसरत असलेल्या बासमतीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून,गेल्या दोन आठवड्यांत दर 10 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तसेच पुढेही वाढण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
IND VS PAK : मसाल्याच्या पदार्थांपासून ते कांद्यापर्यंत! भारत-पाक तणावाचा निर्यातीला फटका, किंमती भडकणार?