शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट, दसऱ्याच्या दिवशी झेंडूचे दर कडाडणार? मार्केटमधून महत्वाची अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : दसऱ्याच्या सणात झेंडूला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे शेतकरी दसरा आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलतील याची खात्री करून लागवड करतात.
मुंबई : दसऱ्याच्या सणात झेंडूला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे शेतकरी दसरा आणि दिवाळीत मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलतील याची खात्री करून लागवड करतात. मात्र यावर्षी सातत्याने झालेल्या पावसामुळे इतर पिकांबरोबरच फुलशेतीलाही मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे फुलांची आवक मंदावली असून, बाजारात आलेली भिजलेली फुले कवडीमोल दराने विकली जात आहेत. दुसरीकडे, दर्जेदार आणि ताजी फुलांची मागणी वाढल्याने त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी बाजारात झेंडू किती प्रमाणात येतो, याकडे विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाल्यास दर २० रुपयांवर येऊ शकतात, तर कमी आवक झाल्यास दर २०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
झेंडू शेवंतीला मागणी
दसऱ्याच्या सणासाठी झेंडू आणि शेवंती ही प्रमुख फुले मानली जातात. विविध रंगांतील शेवंती व झेंडूच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र पावसामुळे फुलांचे उत्पादन आणि वाहतूक दोन्हीवर परिणाम झाल्याने बाजारात आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या दरात शेवंती १५० ते २०० रुपये किलो, झेंडू १२० रुपये किलो, तर सोनचाफा ४०० रुपये शेकडा या दराने विकला जात आहे.
advertisement
बाजारातील स्थिती
नवरात्री आणि दसऱ्याच्या काळात दिवसभर फुलबाजारात गजबज असते. मात्र यंदा पावसाच्या धावपळीमुळे बाजारात तुलनेने शांतता दिसत आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, निम्म्यापेक्षा कमी फुलांची आवक झाल्याने ग्राहकांना अपेक्षित प्रमाणात फुले उपलब्ध होत नाहीत. मंगळवारी पावसाने उसंत घेतल्याने बुधवारी बाजारात फुलांची आवक वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दर वाढ-घट होण्याची शक्यता
जर बुधवारी मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली, तर दर लक्षणीयरीत्या खाली येतील. उलट फुलांचा तुटवडा राहिला, तर घाऊक बाजारात झेंडू २०० रुपयांपर्यंत विकला जाईल आणि किरकोळ बाजारात आणखी महाग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर नोंदवल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात किती फुले उपलब्ध होणार, यावर अंतिम निर्णय बुधवारीच स्पष्ट होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट, दसऱ्याच्या दिवशी झेंडूचे दर कडाडणार? मार्केटमधून महत्वाची अपडेट आली समोर