हवामान विभागाचा अंदाज
मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने पावसाची तीव्रता वाढली आहे. हा पट्टा दीव, सुरत, नंदुरबार, अमरावतीमार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरला असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील 48 तासांत काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
advertisement
नद्यांचा आणि धरणांचा धोका
पहाटे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, तर राधानगरी धरणाचे सात पैकी पाच दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तरीसुद्धा पंचगंगेची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल 85 बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी नद्यांच्या पातळीत वाढ सुरू असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
14 लाख एकरवरील पिकांचे मोठे नुकसान
गेल्या चार दिवसांत तब्बल 12 ते 14 लाख एकर जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची खरीप हंगामाची स्वप्ने पाण्यात गेली आहेत. विशेषतः सोयाबीन, मका, भात आणि ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की,
पाणी उपसा व निचरा : शेतात पाणी साचल्यास पिकांचे मूळ कुजते. त्यामुळे शक्यतो निचरा करण्याची व्यवस्था करावी.
पिकांची तणनियंत्रण व निगा : ओलाव्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शेतात नियमित फेरफटका मारून रोगाचे लक्षण दिसताच त्वरित उपाययोजना करावी.
रासायनिक फवारणी काळजीपूर्वक : पावसाळ्यात रासायनिक फवारणी करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. पाऊस थांबल्यावरच योग्य औषधे वापरावीत.
चारा साठवणूक : पशुधनासाठी कोरडा व सुरक्षित चारा उपलब्ध ठेवावा, कारण मुसळधार पावसात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने महसूल व कृषी खात्याशी संपर्क साधून पंचनाम्यात नाव नोंदवावे. पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठीही वेळेत अर्ज करावा.
सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची परिस्थिती कायम असून लाखो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार परिस्थितीवर सतत नजर ठेवून असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी यंत्रणा काम करणार आहे.