हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील इतर भागांत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरींसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनशी संबंधित कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत विस्तारलेला आहे. तमिळनाडू किनारपट्टीजवळ सुमारे 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मात्र, राज्यात मॉन्सूनचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी पावसाने उघडीप घेतली आहे.
advertisement
उकाडा वाढला
पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत उष्णतेचा तीव्र अनुभव येतो आहे.
चंद्रपूरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, जे राज्यातील सर्वाधिक आहे.
उर्वरित भागातही तापमान 30 अंशाच्या पुढे गेले असून, उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
येलो अलर्ट : सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
विजांसह हलक्या सरींची शक्यता असलेले जिल्हे: पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना. तर बीड आणि लातूरमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
उकाडा आणि अनियमित पावसामुळे खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पुढील उपाय करणे आवश्यक आहे. जसे की,
जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत करा.
सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, जेणेकरून जमिनीची ताकद वाढेल.
पिकांवर कीड व रोगनियंत्रणासाठी जैविक उपाय वापरा.
उकाडा वाढल्यास पाणी व्यवस्थापन प्रभावी ठेवा, गरज असल्यास ठिबक सिंचन प्रणाली वापरा.
पानांवर ताण जाणवत असल्यास फॉलिअर स्प्रे (उदा. पोटॅशयुक्त द्रावण) मारावा.
दरम्यान, राज्यात सध्या हवामानातील चढ-उतार सुरू आहेत. काही भागांत उकाडा असून, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा आहे. अशा स्थितीत नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, आणि योग्य त्या खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरक्षित राखण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाचा वापर करावा.