शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
जगभरात शेतीसंबंधित तंत्रज्ञान, प्रक्रिया, हवामान अनुकूल पद्धती आणि आधुनिक यंत्रसामग्री सतत बदलत आहेत. हे सर्व बदल राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी सक्षम करणे, हे शासनाचे ध्येय आहे.
अभ्यासदौऱ्यासाठी पात्रतेचे निकष काय?
स्वतःच्या नावावर जमीन, शेती उत्पन्नावर आधारित उपजीविका आवश्यक. शेतकरी हा स्वतःच शेती करणारा असावा, त्याच्या नावावर 7/12 आणि 8अ उतारे (मागील 6 महिन्यांचे) असावेत. त्याचे उत्पन्न मुख्यतः शेतीवर आधारित असावे आणि ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीत त्याची नोंद असलेली फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, अर्जात स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
advertisement
शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! या योजनेच्या माध्यमातून थेट खात्यावर पैसे जमा होणार, 25 हजार कोटींची तरतूद
एक लाभार्थी धोरण लागू
शेतकरी कुटुंबातून फक्त एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सहलीदरम्यान इतर कुटुंब सदस्यासोबत जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. शिधापत्रिका, आधार कार्ड व वयाचा पुरावा आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 25 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही, मात्र एम.बी.बी.एस डॉक्टरकडून तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पारदर्शक व काटेकोर अटींची गरज
शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असणे बंधनकारक आहे, जो दौऱ्याच्या वेळी किमान तीन महिन्यांसाठी वैध असावा. तसेच शेतकरी कोणत्याही सरकारी, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेत कार्यरत नसावा. डॉक्टर, वकील, सीए, अभियंता व कंत्राटदारही अर्जासाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत.
नवीन शेतकऱ्यांना प्राधान्य
पूर्वी केंद्र, राज्य, कृषी विद्यापीठ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत शासकीय परदेश दौऱ्याचा लाभ घेतलेल्यांना या योजनेतून वगळण्यात येईल. अर्ज करताना या बाबतचे स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. शेतकऱ्यांची अंतिम निवड राज्यस्तरीय समितीमार्फत केली जाईल.
अर्जासाठी संपर्क कोठे साधावा?
या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.