थोरात यांच्याकडे पाच एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र दरवर्षी वाढणारा खर्च, पाण्याची कमतरता आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्यांना फारसा फायदा होत नव्हता. यामुळे त्यांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. एके दिवशी त्यांनी यूट्यूबवर अव्होकॅडो या फळाबद्दल माहिती पाहिली आणि त्यातून प्रेरणा घेतली.
advertisement
अव्होकॅडो हे विदेशी फळ कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते आणि बाजारात त्याला भरपूर मागणी आहे. हे लक्षात आल्यावर त्यांनी सखोल अभ्यास सुरू केला. नुसती माहिती न घेता त्यांनी प्रत्यक्ष कृती सुरू केली. एका एकर क्षेत्रात काही झाडे लावून प्रयोग केला. योग्य काळजी घेतल्यानंतर झाडं चांगली वाढली आणि काही वर्षांत फळधारणा सुरू झाली.
आज त्या एक एकर अव्होकॅडो शेतीतून परमेश्वर थोरात यांना प्रतिवर्षी किमान 11 लाख रुपयांचा नफा मिळतो. उर्वरित चार एकरमध्ये ते अजूनही पारंपरिक शेती करत आहेत. मात्र भविष्यात अधिक क्षेत्रात अव्होकॅडोची लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे. कमी पाण्यात जास्त नफा मिळवणारी ही शेती त्यांच्यासाठी वरदान ठरली आहे.
परमेश्वर थोरात यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. बदलत्या हवामानात आणि टंचाईच्या काळात पारंपरिक शेतीसह नव्या संधी शोधल्यास यश शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मेहनत, अभ्यास आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर शेतीतही आर्थिक समृद्धी साधता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.





