सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी आपापल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतीमध्ये पिकांची लागवड करतात आणि उत्पन्न देखील त्यांना चांगले मिळते. शेतकरी बाबुराव भोसले यांनी शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती. आतापर्यंत टमाट्याचे 15 तोडे झाले असून यामधून शेतकरी भोसले यांना 14 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
बाबुराव भोसले यांनी दोन एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन, सुधारित तंत्राने लागवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन करुन टोमॅटोचे किफायतशीर उत्पन्न मिळाले आहे. इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याचे, त्या विषयाबाबत आपली स्वतः ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. या शेतकऱ्यांपैकीच एक पापरी गावातील शेतकरी बाबुराव भोसले आहेत. बाबुराव भोसले यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
advertisement
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कायम पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती असल्याने कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांच्या शोधात ते असतात. त्यांच्या प्रयत्नांना घरच्यांचीही तेवढीच मोलाची साथ असल्याने टोमॅटो चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. यासाठी त्यांना 2 लाख रुपये खर्च आला आहे.
शेतीमधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर इतर गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांचा कायम येत असतात. या टमाट्याची विक्री खरेदी करण्यासाठी थेट व्यापारी त्यांच्या शेतात येतात. जाग्यावर त्या टमाट्याची खरेदी होते आणि तेथेच त्यांना पैसे सुद्धा देण्यात येते. आतापर्यंत टमाट्याची 15 तोडे झाली असून त्यापासून 14 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न शेतकरी बाबुराव भोसले यांना मिळाले आहे.





