मागील महिन्यांतील संकटानंतर दिलासा
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अतिशय निराशाजनक दरांना सामोरे जावे लागले होते. मार्च ते मे महिन्यादरम्यान सोयाबीनचे दर 4,000 रुपयांच्या खाली घसरले होते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. परिणामी, अनेकांनी आपले पीक साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्याच साठवलेल्या सोयाबीनला बाजारात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
advertisement
दरवाढीमागील प्रमुख कारणं काय?
जागतिक मागणीत वाढ: खाद्यतेल व प्रोटीनच्या मागणीत वाढ झाली आहे.
अमेरिकेतील साठा घटण्याची शक्यता: यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले.
निर्यात मर्यादा: काही देशांनी सोयाबीन निर्यात थांबवली आहे, ज्यामुळे भारतीय मालाला मागणी वाढली. तसेच भारत सरकारच्या आयात धोरणात बदल झाले नाही त्यामुळे स्वदेशी उत्पादनाला अधिक महत्त्व आहे.
सध्या विक्रीपासून शेतकरी दूर
दरवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांचा सध्या बाजारात प्रत्यक्ष सहभाग कमी आहे. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे तणनियंत्रण, कीड नियंत्रण आणि आंतरमशागत यामध्ये शेतकरी व्यस्त आहेत. त्याचबरोबर अनेकांना अजूनही दर अधिक वाढतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साठवलेल्या मालाची आवक कमी आहे आणि मागणी जास्त असल्यामुळे दरात सुधारणा होत आहे.
भविष्यातील दरवाढ टिकून राहणार?
मार्च-मेमध्ये जेव्हा दर 4,000 रुपयांखाली गेले होते, तेव्हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे सध्या मिळणारे 4,700-4,800 रुपये प्रतिक्विंटल हे त्यांच्यासाठी दिलासादायक आहेत. मात्र, पुढील आठवड्यांत जागतिक बाजारातील स्थिती, सरकारचं आयात-निर्यात धोरण आणि देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण यावर दरवाढीचा कल ठरेल.
शेतकऱ्यांना यंदा खरीपातील पीक चांगलं मिळेल आणि बाजारभावही टिकून राहील, अशीच आशा आहे.परंतु सावध पावलं उचलून योग्य वेळी विक्री करणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.