बटाईदार म्हणजे काय?
बटाईदार म्हणजे असा व्यक्ती जो दुसऱ्याची शेतजमीन ठराविक अटींवर कसतो. जमीन मालक आणि बटाईदार यांच्यात एक तोंडी किंवा लेखी करार होतो, ज्याअंतर्गत बटाईदार शेतात पिकवलेले उत्पादन मालकाशी "बटवारा" म्हणजेच वाटून घेतो. सामान्यतः उत्पादनाचे 50% मालकाचे आणि 50% बटाईदाराचे असे प्रमाण ठरवले जाते. काही वेळा रोख भाडे किंवा खर्चाच्या वाटणीनुसारही हा करार होतो.
advertisement
बटाईदाराचा शेतजमिनीवर काय हक्क असतो?
बटाईदार हा शेतजमिनीचा मालक नसतो. तो फक्त त्या जमिनीवर शेती करणारा कास्तकार असतो. त्यामुळे त्याचे जमिनीवर मालकी हक्क नसतात. मात्र, काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास त्याला काही प्रमाणात संरक्षण दिले जाऊ शकते.
जर बटाईदाराने दीर्घकाळ शेत कसली असेल, सातबाऱ्यावर त्याची नोंद झाली असेल किंवा जमीनधारकाने त्याला जास्त काळ जमीन वापरू दिली असेल, तर काही राज्यांमध्ये त्याला कायद्याने संरक्षण मिळू शकते.
महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार, जर शेतजमिनीवर बटाईदार नियमित शेती करत असेल, तर त्याची कास्तकार म्हणून नोंद होऊ शकते. मात्र, त्यासाठी लेखी करार, उत्पन्नाचे कागदपत्रे, खर्चाच्या पावत्या यांसारखा पुरावा आवश्यक असतो.
बटाईदारांचे काय अडथळे असतात?
कायद्याचा अडाणीपणा: बटाईदार शेतकऱ्यांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे त्यांचे हक्क अबाधित राहत नाहीत.
सातबाऱ्यावर नोंद नसणे: अनेक बटाईदार तोंडी करार करतात. त्यामुळे ना त्यांचं नाव सातबाऱ्यावर येतं ना कोणतीही शासकीय योजना त्यांना लागू होते.
सरकारी योजनांपासून वंचितता: कृषी अनुदान, पीकविमा, कर्ज योजना या मुख्यतः जमीन मालकाच्या नावाने मिळतात. त्यामुळे बटाईदारांना या लाभांपासून वंचित राहावं लागतं.
शासनाची भूमिका आणि उपाययोजना
मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचे हक्क मजबूत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘कास्तकार नोंदणी’ प्रक्रियेवर भर दिला आहे. काही राज्यांमध्ये बटाईदारांची ऑनलाइन नोंदणी करता येते, ज्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळू शकतो. परंतु महाराष्ट्रात अजूनही अनेक बटाईदार अशा नोंदणीपासून वंचित आहेत.
एकूणच काय तर बटाईदार हा शेतमालक नसला, तरीही तो शेताच्या व्यवस्थापनात आणि शेतीत महत्त्वाची भूमिका बजावतो.