दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून वाटण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. ही केवळ एक प्रथा नसून, समृद्धी आणि विजयासाठी याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात.
कौत्स आणि वरतंतूची कथा - पैठणमध्ये कौत्स नावाचा एक शिष्य होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने आपले गुरू वरतंतू यांच्याकडे गुरुदक्षिणा मागितली. गुरूंनी त्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितल्या. कौत्सेने ही मागणी पूर्ण करण्यासाठी रघुवंशी राजा रघू यांच्याकडे मदत मागितली. राजा रघू यांनी इंद्रदेवावर स्वारी केली. यामुळे घाबरून इंद्रदेव आणि धनदेवता कुबेर यांनी पृथ्वीवरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सोन्याच्या नाण्यांचा (सुवर्णमुद्रा) वर्षाव केला. कौत्सेने आपल्या गुरुदक्षिणेपुरते सोने घेतले आणि बाकीचे सोने राजा रघू यांनी प्रजेला वाटले. हा दिवस विजयादशमीचा होता. या घटनेची आठवण म्हणून लोक आजही आपट्याची पाने सोनं म्हणून वाटतात.
advertisement
पांडवांची शस्त्रे - अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी ती शस्त्रे बाहेर काढली, तेव्हा ती सोन्यासारखी तेजस्वी दिसत होती. शमी किंवा आपट्याच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष पवित्र मानले जाते, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांची पूजा करून ती पाने वाटली जातात. (अनेक ठिकाणी शमीच्या झाडाऐवजी आपट्याची पाने वापरली जातात, कारण शमीचे झाड दुर्मीळ आहे.)
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व -
सीमोल्लंघन ही प्रथा विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात अधिक दृढ झाली. दसऱ्याच्या दिवशी राजा आणि सैनिक राज्याच्या सीमा ओलांडून मोहिमेवर जात असत, कारण या वेळी पाऊस संपलेला असतो आणि प्रवासाला सुरुवात करणे योग्य मानले जाई. मोहिमेतून किंवा युद्धातून विजयी झाल्यावर परतलेले सैनिक शत्रूच्या प्रदेशातून लुटलेले सोने आणि संपत्ती आणत असत. ते सोने त्यांनी देवापुढे ठेवून नंतर आपापल्या आप्तेष्टांना वाटले. कालांतराने युद्धातून प्रत्यक्ष सोने आणणे शक्य नसले तरी, विजयोत्सवाची आणि समृद्धीच्या वाटपाची स्मृती जपण्यासाठी आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून वाटण्याची परंपरा सुरू झाली.
आपट्याचे महत्त्व - आपट्याच्या पानांना अश्मंतक (दोष आणि संकटे दूर करणारा) असेही म्हणतात. ही पाने तेज तत्त्वरूपी मानली जातात, ज्यामुळे वायूमंडल शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एकमेकांना आपट्याची पाने देऊन 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा! अशा शुभेच्छा दिल्या जातात, म्हणजेच तुमच्या जीवनात संपत्ती, यश, आणि आनंदाचा अखंड वर्षाव व्हावा, अशी प्रार्थना केली जाते.
दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)