पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळा, दाभा येथील सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, मी हा उपक्रम स्वखर्चाने माझ्या शाळेत राबविला आहे. माझ्या या उपक्रमाची दखल सगळ्यांनी घेतली. सगळ्यांना तो उपक्रम आवडल्याने आता राज्यभरात राबविण्याचा विचार सुरू आहे. या उपक्रमात अलेक्सा डॉलच्या साहाय्याने मुलांना विविध शैक्षणिक विषयांवर प्रश्न विचारता येतात व तात्काळ उत्तरं मिळतात. संवादात्मक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते, सामान्य ज्ञान वृद्धिंगत होते आणि ग्रामीण भागातील मुलांनाही डिजिटल तंत्रज्ञानाचा स्पर्श मिळतो. तसेच मुलं, शिक्षक आणि पालक यांच्यात शैक्षणिक संवाद अधिक प्रभावीपणे साधला जातो, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
ऑनलाईन घर भाडं भरत असाल तर थांबा! ही बातमी खास तुमच्यासाठी; होणार मोठा बदल
पुढाकार आणि सहयोग
हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे. यासाठी ICICI बँकेच्या CSR निधीतून जिल्ह्यातील शाळांना अलेक्सा डॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दाभा (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या संकल्पनेची सुरुवात झाली. प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शिक्षक दिनी 5 अलेक्सा डॉलचे वाटप
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त 'निपुण भारत अभियानात’ अव्वल ठरलेल्या चांदसुरा, फॉरेस्ट मालूर, दहेन्द्री, वाठोडा आणि पिंपळखुटा मोठा या पाच शाळांना अलेक्सा डॉल आणि व्हर्च्युअल रियालिटी (VR) युनिटचे वितरण करण्यात आले. हा विशेष सोहळा विभागीय आयुक्त आणि CEO यांच्या हस्ते पार पडला.
उपक्रमाचा परिणाम
या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षण साधनांविषयी उत्सुकता निर्माण होणार आहे. प्रश्न विचारण्याची आणि उत्तर शोधण्याची क्षमता विकसित होईल, तसेच आत्मविश्वास, जिज्ञासा आणि ज्ञानाची पातळी वाढेल. ग्रामीण शाळा देखील स्मार्ट एज्युकेशनच्या दिशेने वेगाने वाटचाल करतील.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक साधता यावी. त्यांच्या इंग्रजी संवादकौशल्यात प्रगती व्हावी. कुतूहल वाढून नवे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी आणि तंत्रज्ञानाबाबतची भीती दूर व्हावी. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. हा संपूर्ण उपक्रम आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून साकारला जात आहे. ‘निपुण’ उपक्रमातील कामगिरी व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे आता केवळ 50 शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या शाळांना हे साहित्य पुरवल्या जाणार आहे, असे संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी सांगितले.