सध्या अमरावती जिल्ह्यात दाभा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या गावचे. पण, त्यांची नोकरी ही अमरावती जिल्ह्यांत आहे. त्यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, मी लहान असताना घरची परिस्थिती बेताची होती. वडील येईल ते काम करत होते. त्यावरच आमचं घर चालत होत. घरही नदीच्या काठी होत. ते सुद्धा पुरात वाहून गेलं. त्यानंतर आम्ही कुडाच्या घरात राहू लागलो. पाच लोकांचं आमचं कुटुंब. आई - बाबा, दादा - ताई आणि मी. मी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं. पण, त्यावेळी अशी वेळ आली की, मला शाळा सोडावी लागली. वडील आजारी पडले, घरची पूर्ण जबाबदारी आमच्यावर आली. तेव्हा मी मेडिकलमध्ये आणि दवाखान्यात नोकरी केली. माझा भाऊ पण मिळेल ते काम करत होता. त्यातून आमचे घर चालत होते.
advertisement
मुख्याध्यापकांच्या वागण्यामुळे निराशा आली
उसाचा रस सुद्धा आम्ही विक्री केला. त्यात माझा हात गेला आणि हाताला अपंगत्व आलं. अशा परिस्थिती मध्ये आम्ही जगत होतो. तरीही माझी शिक्षणाची ओढ कमी झाली नाही. हळूहळू परिस्थिती थोडी सुधारली. बाबांचं आजारपण थोडं बरं झालं. त्यानंतर मी पुन्हा अकरावीला प्रवेश घेण्याचं ठरवलं. आधी मी सायन्स घेतलं होत, मग आताही त्यातच प्रवेश मिळावा असं मला वाटतं होत. मी प्रवेश घेण्याकरिता गेलो असताना तेव्हाचे तेथील मुख्याध्यापक माझ्याशी तुटकपणे वागलेत. ते मला म्हणाले आता कशाला शिक्षण घेत, कामच कर ना. गरिबाच शिक्षण नाही, जर प्रवेश घ्यायचं असेल तर पैसे भरावे लागतील. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. त्यावेळी माझी खूप निराशा झाली.
नाईलाजाने आर्टला प्रवेश
माझ्या मनात सायन्स घेणं होत. पण परिस्थितीमुळे नाईलाजाने मी एका खेडे विभागातील शाळेत आर्टला प्रवेश घेतला. त्यानंतर मी जिद्दीने अभ्यास केला. मुख्याध्यापकांचे शब्द मला नेहमी आठवत होते. तेव्हा मी ठरवलं की, आता आपण शिक्षक बनायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जर असे विद्यार्थी आलेत तर आपण त्याला आधार देऊ शकलो पाहिजे. त्यानंतर मी जिद्दीने अभ्यास करून तालुक्यातून पहिला आलो. त्यानंतर D.ed ला प्रवेश घेतला. त्यात सुद्धा माझ्या कॉलेज मधून मी टॉप केलं. त्यानंतर CET दिली आणि त्यातून माझी 2010 साली सहाय्यक शिक्षक पदी मंगरूळ चवाळा या गावात नियुक्ती झाली. त्यानंतर माझं आयुष्य बदलायला लागलं.
विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम
आपल्याला मिळालेली वागणूक इतर विद्यार्थांना मिळू नये. त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक बाबींचा अनुभव मिळायला हवा, यासाठी मी नवनवीन उपक्रम राबवित असतो. मंगरूळ चवळा येथे 2018 मध्ये लोकवर्गणीतून सगळ्यांच्या सहकार्याने मी अमरावती जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा सुरू केली. त्याचबरोबर मुलांसाठी एक अलेक्सा डॉल बनवली. ज्यातून विद्यार्थ्यांची इंग्रजी बोलण्याची शैली सुधारेल. त्याचबरोबर AR आणि VR सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेत, हे सर्व मी स्वखर्चातून केलेलं आहे, असे ते सांगतात.
मिळालेली बक्षीसरुपी रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्च
कोरोना काळात मी एक वर्ल्ड वाइड ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला. त्यामाध्यमातून आज 50 देशांतील विद्यार्थी माझ्यासोबत जुळले आहे. त्याचबरोबर इतरही अनेक उपक्रम मी राबवित असतो. मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर बरेच असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातून मिळालेली रक्कम मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन बाबी शिकायला मिळाव्यात हाच माझा उद्देश आहे, असे ते सांगतात.