धाराशिव: शिक्षक होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. परंतु, गेल्या 10 वर्षांत शिक्षक भरतीबाबत गोंधळाचीच स्थिती राहिली. त्यामुले अनेक पदवीधारकांना शिक्षक होण्याची संधी मिळालीच नाही. या संकटावर मात करत काही तरुणांनी वेगळा मार्ग पत्करला आणि त्यात यश देखील मिळवलंय. धाराशिवमधील सूर्यकांत सूर्य हे अशा तरुणांपैकीच एक नाव आहे. अध्यापक पदविका प्राप्त केली पण नोकरी मिळाली नाही. तेव्हा 50 हजारांच्या गुंतवणुकीत मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू केला. आता यातून वर्षाकाठी 12 ते 13 लाखांची उलाढाल होतेय.
advertisement
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सूर्यकांत सूर्य यांना शिक्षक व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी अध्यापक पदविकेच शिक्षण पूर्ण केलं. परंतु, नोकरी मिळाली नाही. तेव्हा नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या काळात मोबाइलच्या क्षेत्रात संधी वाटली आणि मोबाइल रिपेअरिंगचं शिक्षण घेतलं. मुरुम येथे येऊन 50 हजारांत स्वत:चा व्यवसाय सुरू केला, असं सूर्यकांत सांगतात.
शिक्षणासोबत व्यवसाय, दादरमध्ये मराठी मुलगा चालवतोय फूड स्टॉल, मिळतात खास पदार्थ, दिवसाची कमाई...
वर्षाला 12 लाखांची उलाढाल
नोकरी शोधण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यातून आता चांगली कमाई होतेय. मुरूम शहरात मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या व्यवसायातून वर्षाकाठी 12 ते 13 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे कधी नोकरी शोधणाऱ्या सूर्यकांत यांनी 4 कामगारांना रोजगार दिला आहे. एका निर्णयानं आपलं आयुष्य बदललं. सर्वांनाच शिक्षक होण्याची संधी मिळेल याची शक्यता नाही. परंतु, वेगळा मार्ग पत्करूनही आपण यशस्वी होऊ शकतो, असं सूर्यकांत सांगतात.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिक्षण घेऊनही अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही. तेव्हा काही तरुण खचून जातात. अशांसाठी सूर्यकांत सूर्य यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. व्यवसायाच्या माध्यमातूनही आपण चांगली कमाई करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलंय.