छत्रपती संभाजीनगर शहरातील राजन काबरा यांनी सीएच्या मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं असून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. 600 गुणांच्या या परीक्षेत त्यांना 516 गुण मिळाले. राजन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर शहरातील टेंडर केअर स्कूल येथे झाले. तर पुढे देवगिरी कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून कॉमर्समध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर केपीएमजीमध्ये आर्टिकलशिप केली. सध्या राजन हे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
advertisement
राजन यांनी जुलै 2021 मध्ये सीपीटी (आताचे फाउंडेशन) परीक्षेत 378/400 गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला. मे मध्ये झालेल्या CA परीक्षेतही 600 पैकी 516 गुण मिळून देशात पहिला आला आहे. “ज्या दिवशी परीक्षेचा निकाल होता त्या दिवशी मी सकाळी झोपलेलो होतो आणि आमचे मेल प्रेसिडेंट होते त्यांनी माझ्या वडिलांच्या फोनवर फोन केला. कारण त्या दिवशी माझा फोन लागत नव्हता. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की मी पहिला आलोय. मला जेव्हा माझ्या वडिलांनी येऊन सांगितले, तेव्हा मला असं वाटलं की मी काहीतरी स्वप्नच बघतोय आणि याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता,” असं राजन यांनी सांगितले.
“माझ्या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचे खूप मोठं योगदान आहे. पण सगळ्यात जास्त योगदान हे माझ्या बहिणीचे आहे. तिने मला वेळोवेळी अभ्यास करण्यासाठी मदत केलेली आहे. मी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता. मला वाटलं होतं की मी चांगल्या गुणांनी पास होईन, पण देशात पहिला याची मी कल्पना देखील केली नव्हती,” असं राजन लोकल18 सोबत बोलताना म्हणाला.
“राजन हा अगदी लहानपणापासून हुशार विद्यार्थी आहे. आम्ही त्याला अभ्यास कर यासाठी कधी दडपण दिले नाही किंवा कधीही त्याच्यावर दबाव टाकला नाही. राजनने सर्व अभ्यास हा अगदी खेळत सर्व अॅक्टिव्हिटी करत केलेला आहे. तो देशामध्ये पहिला आला आहे. एक आई म्हणून याचा मला खूप अभिमान आहे. भविष्यामध्ये त्याला जे पण काही करायचं आहे ते त्याने करावं, यासाठी त्याच्या कायम सोबत असेल,” असं राजनची आई म्हणाली.
“जेव्हा आम्हाला फोन आला की राजन देशामध्ये पहिला आला आहे, तेव्हा मला विश्वास बसला नाही. अगदी सगळं स्वप्न असल्यासारखं वाटत होतं. तो अगदी शाळेत असल्यापासून हुशार होता. त्याने जे यश संपादन केले आहे, त्याचा आम्हाला अभिमान असून खूप आनंद होत आहे,” असं राजनचे वडील म्हणाले.