छत्रपती संभाजी नगर: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा (12th Exam Result 2024) निकाल आज जाहीर झाला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. राज्याचा निकाल 93.37 टक्के लागला असून 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय. तर, संपूर्ण राज्यातून छत्रपती संभाजीनगरची रहिवासी तनिषा सागर बोरामणीकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला तब्बल 100 टक्के गुण मिळाले आहेत.
advertisement
तनिषा ही कॉमर्सची विद्यार्थिनी. तिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. तर, इंग्रजीत 89, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये 95 आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले. म्हणजेच तिला एकूण 582 गुण मिळाले आणि क्रीडा विषयात तिने 18 गुण पटकावले. त्यामुळे ती 100 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे तनिषा ही राष्ट्रीय पातळीवरील नामवंत बुद्धिबळपटू आहे. आपल्या याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने आज पालकांना सुखद धक्का दिला.
हेही वाचा : दुर्लक्ष करू नका! 11 वी प्रवेशाबाबत महत्त्वाचं अपडेट, 24 मे पासून 'ऑनलाईन रजिस्ट्रेशन' सुरू
तनिषा सांगते, 'मी सुरुवातीला काहीच अभ्यास केला नव्हता. शेवटच्या दीड महिन्यात मन लावून अभ्यास केला. एकदा अभ्यासाला बसले की तो पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही, हा नियम तंतोतंत पाळला. म्हणजे अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच केला. परीक्षेच्या काळात खेळाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. शिवाय आधीच्या बारावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. त्यामुळे फार मदत झाली. मला 100 टक्के गुण मिळाले याचा खरच खूप आनंद होतोय. मी या यशाचं श्रेय आई-वडील आणि माझ्या शिक्षकांना देते.'
'तनिषाला 95 टक्के मिळतील असं वाटलं होतं पण 100 टक्के मिळतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती. तिने एवढे गुण मिळवले त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. तिने भविष्यातही असंच यश मिळवावं आमचा कायमच तिला पाठिंबा असेल', अशा भावना तनिषाची आई रेणुका बोरामणीकर यांनी व्यक्त केल्या. तर, तिचे वडील सागर बोरामणीकर यांनी तनिषाबाबत अभिमान व्यक्त करत तिला भविष्यात सीए व्हायचंय असं सांगितलं आणि ती हे यशदेखील नक्कीच संपादन करेल असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, तनिषाला दहावीला 98 टक्के गुण मिळाले होते. सध्या सोशल मीडियावर राज्यभरातून तनिषावर शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव होतोय.





