सौरभ ढगे यांच्या घरची परिस्थिती बिकट, वडील शेतकरी, यातच सौरभचे बालपण गेलं. सौरभचे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावाकडे जिल्हा परिषद शाळा ढेंबरेवाडी येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्यालय पांगरी येथे झाले. पुढील पदवीचे शिक्षण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून बाबुरावजी घोलप महाविद्यालय येथून अर्थशास्त्र या विषयातून पदवी घेतली. एमपीएससीचा अभ्यास गावाकडेच करून त्याने महसूल सहायक पदाचे यश संपादन केले आहे. सध्या सौरभ यांची नेमणूक सरकारी वकिलांचे कार्यालय, मुंबई हायकोर्ट येथे झाली आहे.
advertisement
सौरभला मामाच्याच मुलाने एमपीएससी करण्याचा सल्ला दिला. सौरभने एमपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. सौरभने जेव्हा पहिल्यांदा एमपीएससीची प्रिलिम्स दिली होती, तेव्हा दोन मार्क कमी मिळाले होते. दुसऱ्यांदा पीएसआयची परीक्षा दिली, तेव्हा प्रिलिम्स दिली, त्यात तो पास झाला, पण मेन्सला मार्क कमी आले.
तरीदेखील हार न मानता त्यांनी तिसऱ्यांदा एमपीएससीची तयारी केली आणि आज शेतकऱ्याचा मुलगा सौरभ महसूल सहायक पदावर नियुक्ती झाली आहे. एमपीएससीची तयारी करत असताना सौरभला लागणारी आर्थिक मदत सौरभचे मामा ज्ञानेश्वर काळेल आणि सौरभच्या लहान भावाने केली. एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या मुलांनी खचून न जाता तयारी करावी, एके दिवशी यश नक्की मिळेल, असा सल्ला सौरभ ढगे यांनी दिला आहे. त्याच्या या यशाबद्दल हराळवाडी परिसरात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.





